राजकारणात कधीच कोणाला हलकं घ्यायचं नसत हा राजकारणाच्या चाणक्यनितीतला पहिला नियम असतो, आणि हा नियम ज्यांनी विसरला त्यांनी एकतर राजकारणात राहू नये किंवा मग राजकारणात राहून तोंड लपवून फिरावं.. त्याला शून्य म्हणण्याची किमंत अनेकांना मोजावी लागली आहे त्याची तर मोजदाद अजून सुरु आहे. अगदी पानिपतच्या भाषेत म्हणायचं खुर्दा झालाय.. पण मग ज्याला शून्य म्हटल तो कुठं आहे तो अनेकांसाठी आपल्या मुठीत जिद्द म्हणून जोपासलेला, भाळावर गुलाल म्हणून मिरवलेला अनेकांची श्रीमंती, ज्याचे नाव आहे शिवसेेना जिल्हाप्रमुख ‘ देवदत्त उर्फ दत्ता सामंत’
राजकारणात कधी कधी एखाद्या नेत्याला संपवण्यासाठी त्याला हरवणं गरजेचं नसतं, त्याला तो आमच्यासाठी शून्य आहे असं म्हणणं म्हणजे राजकारण असते. सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे, दत्ता सामंत यांच्याबाबतीतही तेच घडलं. त्यांना ‘दत्ताशून्य’ ठरवण्याचा प्रयत्न झाला. आणि कोट्यधीशांना एका शून्याने हरवले !!
ताकद शून्य, प्रभाव शून्य, भविष्य शून्य.. अशी गणितं मांडली गेली. पण जिथं बसून हे सगळ भाकित मांडले गेले ते हे विसरले की हे तेच मालवण आहे जिथं १९९० साली एका नवख्या उमेदवाराच्या भाळी गुलाल लागला, २००६ साली महाराष्ट्राचे राजकारण फिरल.. आणि २०२४ साली तर कालचक्र फिरवलं गेल.. आणि त्या प्रत्येक वेळी दत्ता तिथच शून्य बनून एक एक आकडा मताधिक्यापर्यंत नेत होता. शून्याचा अर्थ न समजणाऱ्यांनी हे विसरलं की, शून्य ही समाप्ती नसते.. ती पूर्णत्वाची सुरुवात असते.
दत्ता तुमची नेमकी ओळख काय, असा कधीही प्रश्न त्यांना विचारा त्यांचे उत्तर एकच, मी कायम राणे समर्थक हेच माझे सगळ्यात मोठे पद.. मला वाटत महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता असताना वाढत जाणाऱ्या संघटनपर्वात, दत्ता सामंत हे दादांनी घडवलेल्या नव्वदच्या बॅचमधले ते असे स्कॉलर आहेत की अजुनही त्यांच्या प्रत्येक परिक्षेच्या यशात तु दादांच्या शाळेतलो विद्यार्थी ना, अशी ओळख आवर्जून काढतो.
नारायण राणे यांची शिवसेना ते पुन्हा निलेश राणे यांची शिवसेना या प्रवासात दत्ता सामंत किती मोठे नेते झाले आहेत, यापेक्षा त्यांनी ‘जनसामान्यांचा दत्ता’ ही ओळख वर्षानुवर्षे अधिक घट्ट कशी केली, हे जास्त महत्त्वाचे आहे. याच नात्यामुळे दरवर्षी सात जानेवारीला जमणारा माणूसमेळा हा केवळ शक्तिप्रदर्शन नसतो, तर “आपला माणूस आजही आपल्यासोबत आहे” या भावनेचं सार्वजनिक औक्षण असतं. आणि हीच भावना दत्ताला ‘विजयी भव’ म्हणत शुभेच्छा देते.
तुम्ही दत्ताला ओळखता का, याचं उत्तर ‘नाही’ असू शकतं. पण दत्ताला तुमची ओळख नक्कीच असते — हाच त्याचा सगळ्यात विशेष गुण आहे. आणि हाच प्रत्येक सात जानेवारीचा आत्मा आहे.
दादांच्या पहिल्या निवडणुकीपासून आजच्या चार दशकांच्या प्रवासाकडे पाहिलं, तर एक गोष्ट ठळकपणे जाणवते. मागच्या दहा वर्षांत बॅकफूटवर राहून दत्ताने जी राजकीय बांधणी केली, ती त्याने अवघ्या एका महिन्यात सिद्ध करून दाखवली. दत्ता फर्डा वक्ता नाही. त्याची सोशल मीडिया किंवा पीआर टीमही तथाकथित अर्थाने स्ट्रॉंग नाही. तरीही दत्ता कायम टॉप ट्रेंडिंग असतो. कारण तो ट्रेंड नाही, तो ग्राउंड रिऍलिटी आहे.
तो गावखेड्यातला माणूस आहे. आजही त्याचे प्रश्न एसटी, रस्ते, साकव, पाणी याच भोवती फिरतात. नेता म्हणून फाय-जी किंवा एआयच्या गप्पा मारणं लोकांना अपेक्षित नाही. लोकांना अपेक्षा आहे — त्यांच्या गरजांबद्दल बोला, आणि त्या पूर्ण करण्याची जिद्द दाखवा. दत्ता हरल्यानंतरही लढत राहिला, माणसं जोडत राहिला. हे एक सूत्र जरी समजलं, तरी बदललेल्या राजकारणात पुढे काय होणार, याची अनेक उत्तरं मिळतात.
सोशल मीडियावर चालणाऱ्या आजच्या राजकारणात दत्ता सामंत यांचं राजकारण अजूनही पारंपरिक आहे — आणि म्हणूनच ते प्रचंड प्रभावी आहे. मतदाराला तो आकडा म्हणून नाही, तर माणूस म्हणून पाहतो. दत्ताच्या राजकारणात ना कोणी कायमचा शत्रू असतो, ना कोणी जन्मजात विरोधक. दत्ता सामंत यांची कुठलीही स्ट्रॉंग सोशल मिडीया टिम नाही पण दत्ताकडे गावागावात असलेले नेटवर्क आमच्या भाषेेत मिलिनिमय, अल्फा पासून ते जेनझी किडसवर गारुड घालून बसलय..
दत्ताच्या विजयी मोहिमेत तोच असतो. त्याच्या धनुष्याच्या बाणाच्या टोकावर त्याचं लक्ष्य आधीच निश्चित असतं. चार दशकांचा अनुभव असलेला हा नेता स्वतःला फक्त सारथी मानतो — आणि त्याच्या रथावर विजयध्वज अटळ असतो. एकेकाळी “दत्ता तिथे सत्ता” ही टॅगलाईन होती. आज लोकांनीच ती बदलून “दत्ता, पुन्हा सत्ता” अशी केली आहे, हेच त्याच्या राजकारणाचं मोठं यश आहे.
तुम्ही दत्ताला का विरोध करता, याचं ठोस कारण विरोधकांकडे नसणं — हे दत्ताचं सगळ्यात मोठं यश. आणि त्याच वेळी दत्ता जिंकताना घेत असलेली शंभर टक्के मेहनत स्पष्टपणे दिसणं — हेही त्याचं यश. त्याच्या मेहनतीकडे तुम्ही जिथून पाहाल, तिथून ती मेहनतच दिसते. पण या सगळ्यांत त्याने स्वीकारलेलं देवव्रताचं भीष्मपण फार मोठं आहे. “विकासगंगा पुन्हा आणीन” हा त्याने स्वतःला दिलेला शब्द होता.
आज जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा वाढदिवस. नव्वदच्या बॅचमधला टॉपचा विद्यार्थी आज कुलगुरुपदावर पोहोचल्यासारखा हा प्रवास आहे. मधल्या काळात जे काही ऐकावं लागलं, जे अनुभवलं, त्यावर विजय मिळवत आज तो खऱ्या अर्थाने देवदत्ताचा शून्यदत्तापर्यंतचा प्रवास हा खऱ्या अर्थाने सत्ताधिशाचा आहे.
जाता जाता फक्त एवढंच म्हणेन, तुम्ही त्याला शून्य म्हणता की आसमंत याचा दत्ताला कधीच फरक पडत नाही. कारण तोच स्वताला शून्य म्हणतो आणि चालत राहतो.. आणि चालून गेल्यावर जे क्षितीज दिसते त्याला काही लोक ‘आसमंत’ म्हणतात… आणि काही फक्त ‘दत्ता सामंत ‘म्हणतात..






