This Chocolate Day, pause and ask yourself—when was the last time you bought chocolate for you? A gentle reminder about self-care, self-love, and choosing yourself.
चॉकलेट डे आला की हमखास आपल्या आठवणीत येतात, की कुणासाठी तरी घ्यायची कॅडबरी, कुणाला तरी द्यायची डेअरी मिल्क, कुणाच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी छोटीशी गोड भेट. प्रेम, मैत्री, नातेसंबंध यांची गोडी वाढवणाऱ्या या चॉकलेटसाठी आपण सहजपणे दुकानात जातो. पण एक साधा प्रश्न मनात डोकावतो – आपण कधी स्वतःसाठी कॅडबरी खरेदी करतो का?
आपली सवयच अशी झाली आहे. आपल्यापेक्षा आधी इतरांचा विचार करायचा. मुलांसाठी चॉकलेट, जोडीदारासाठी गिफ्ट, मित्रमैत्रिणींना सरप्राइज… पण स्वतःसाठी? “नको रे, त्याची काय गरज?” असं म्हणून आपण स्वतःला मागे सारतो. स्वतःवर खर्च करणं आपल्याला जणू स्वार्थीपणाचं वाटतं. पण खरंच स्वतःला छोटंसं सुख देणं स्वार्थीपणाचं आहे का?
दिवसभराच्या धावपळीत, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. काम, घर, नाती, अपेक्षा… सगळ्यांमध्ये स्वतःसाठी वेळ आणि आनंद शेवटी उरतच नाही. अशा वेळी एक छोटं चॉकलेट स्वतःसाठी घेणं म्हणजे केवळ चॉकलेट खाणं नाही; तो एक छोटासा ‘सेल्फ-लव्ह’चा क्षण असतो. “मीही महत्त्वाचा आहे” हे स्वतःला सांगण्याचा तो गोड मार्ग असतो.
आपण सतत इतरांना खूश करण्याच्या प्रयत्नात असतो. पण स्वतः आनंदी नसाल, तर तो आनंद इतरांपर्यंत पोहोचणार तरी कसा? स्वतःसाठी घेतलेली एक कॅडबरी म्हणजे आयुष्याच्या गडबडीत स्वतःला दिलेली छोटीशी सुट्टी. ती खाताना मिळणारा तो क्षणिक आनंद कदाचित क्षुल्लक वाटेल, पण मनाला मिळणारी ऊब मात्र मोठी असते.
या चॉकलेट डे ला एखाद्यासाठी कॅडबरी घेताना एक छोटीशी गोष्ट करा , एक स्वतःसाठीही घ्या. कोणालाही न सांगता, कुणालाही न देता, फक्त स्वतःसाठी. ती खाताना स्वतःशी दोन शब्द बोला “तूही यासाठी पात्र आहेस.” कारण प्रेम फक्त इतरांवर करायचं नसतं; ते स्वतःपासूनच सुरू व्हायला हवं.
म्हणून यंदा चॉकलेट डे ला प्रश्न बदलूया,
“आपण आपल्यासाठी कॅडबरी का नाही खरेदी करत?”
आणि उत्तर कृतीतून देऊया.








