कणकवली | प्रतिनिधी
“‘नारा’ हा शब्द समजून घेत घेत कणकवलीपर्यंत आलो. पण हा मेळावा घ्यायची वेळ का आली, कुणामुळे आली, कशासाठी आली हेच कळत नाही,” असे थेट आणि आक्रमक शब्दांत सांगत माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी कणकवलीतील सभेत आपल्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “भाजप हा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे. पदांची अपेक्षा नाही, पण स्वाभिमानाने जगणं हा माझा स्वभाव आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी आपली भूमिका ठणकावून मांडली.
आपल्या राजकीय प्रवासाचा धांडोळा घेताना राणे म्हणाले, “मी श्रीमंत घरात जन्माला आलो नाही. शिवसैनिक म्हणून शाखाप्रमुख हे माझं पहिलं पद होतं. त्यानंतर नगरसेवक, बीएसटी चेअरमन, १९९० साली बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आमदार झालो. कणकवलीत पाऊल टाकताना जिल्ह्यातील गरिबी नष्ट करण्याची शपथ घेतली होती.” लोकांच्या आशीर्वादामुळेच आजवर दहा मोठी पदं भूषवता आली, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“आज काही लोक नेता होण्यासाठी येऊ पाहत आहेत. पण मी आलो तेव्हा जिल्ह्यात सोयी-सुविधा नव्हत्या. घरातच बाळंतपण व्हायचं. आज धरणं, रस्ते, वाड्या-वस्त्यांपर्यंत विकास पोहोचला आहे. जात-धर्म-पक्ष न पाहता मी काम केलं,” असे सांगत त्यांनी आपल्या कामाचा पाढा वाचला. “राणे पुरून उरतात. राणेंना संपवणं सोपं नाही. अनेकांनी प्रयत्न केले, पण यश आलं नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले.
पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गचं दरडोई उत्पन्न तीन लाखांपर्यंत नेण्याचं स्वप्न असल्याचं सांगत राणे म्हणाले, “वय कितीही झालं तरी मी मागे पाहत नाही.” पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी-सिंधुदुर्ग समृद्ध करण्याचे उपक्रम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“राणे विरुद्ध राणे कधीच होणार नाही. पक्ष वेगळे असतील, पण घर एकच आहे,” असे सांगत कुटुंबातील एकतेचा ठाम संदेश दिला. निवडणुकीच्या काळात पैशांच्या राजकारणावर घणाघात करत त्यांनी सांगितले, “कोटी घ्या, माझ्यापासून दूर जा, पण पक्षनिष्ठा सांभाळा. पैशांसाठी राजकारण करू नका; मेहनतीचा पैसा फळतो, असा पैसा नाही.”
सभेचा शेवट करताना राणे म्हणाले, “माणूसकी हेच माझं अंतिम ध्येय आहे. सिंधुदुर्गच्या मातीनं मला घडवलं. माझ्यानंतर निलेश-नितेश तुमच्यासोबत उभे राहतील. ते देणारे आहेत, घेणारे नाहीत.” या शब्दांतून नारायण राणेंनी एकीकडे आपली ताकद दाखवली, तर दुसरीकडे विरोधकांना स्पष्ट इशारा देत राजकीय रणसंग्रामासाठी सज्ज असल्याचा संदेश दिला.





