मालवण : मालवण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील मोरेश्वर स्मशानभूमी तसेच महापुरुष बालोद्यान परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून लाईट बंद असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. रात्रीच्या वेळी अंधारामुळे परिसरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.
या समस्येबाबत शिवसेना (उबाठा) पक्षाचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, आज नगरपालिकेच्या लाईट विभागामार्फत त्या ठिकाणच्या हाय-मास्ट लाईटसह मोठ्या पोलवरील लाईट सुरू करण्यात आले. त्यामुळे मोरेश्वर स्मशानभूमी आणि महापुरुष बालोद्यान परिसर पूर्णपणे प्रकाशमय झाला आहे.
लाईट सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, परिसरातील सुरक्षितता व सोयीसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी नगरपालिकेच्या लाईट विभागाचे आभार मानत, भविष्यातही प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.





