मालवण तालुका पत्रकार समितीचा वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ मसूरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलमध्ये उत्साहात संपन्न झाला. यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा ‘मालवण रत्न पुरस्कार’ शिक्षिका व इतिहास अभ्यासक सौ. ज्योती रविकिरण तोरसकर यांना, तर ‘कलारत्न पुरस्कार’ श्री. निलेश गवंडी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

समाजात पत्रकारांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून मालवणमधील पत्रकार हे केवळ पत्रकार म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील माणूस म्हणून सर्वांशी वागतात. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या काळात समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले होते आणि तेच कार्य आज मालवण तालुक्यातील पत्रकार प्रामाणिकपणे करत आहेत. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्याचे काम पत्रकारांकडून होत आहे, हे निश्चितच प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक सौ. ज्योती रविकिरण तोरसकर यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना केले.

यावेळी आपल्या भाषणात ज्योती तोरसकर यांनी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा तसेच मसुरे गावाच्या शिवकालीन व त्यापूर्वीच्या समृद्ध इतिहासाचा मागोवा घेतला. मसुरे गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला असून, हा इतिहास संकलित करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले.
मालवण तालुका पत्रकार संघाच्या वतीने यंदा कलारत्न पुरस्कारासाठी निष्काम रंगकर्मी निलेश गवंडी यांना सन्मानित करण्यात आले. रंगभूमी, लोकसंगीत, लोकनृत्य आणि भजन परंपरेच्या माध्यमातून मालवणच्या सांस्कृतिक सेवेत निलेश गंवडी यांनी दिलेले योगदान हे अनेकांना प्रेरणादायी आहे. निलेश गंवडी यांच्या या रंगसेवेचा बहुमान या पुरस्काराच्या निमित्ताने झाल्याची कृतार्थ भावना यावेळी उपस्थितांमध्ये जाणवत होती.
पुरस्कार स्वीकारताना कलारत्न पुरस्कारार्थी निलेश गवंडी म्हणाले, कला माणसाला जीवन जगण्याची दिशा देते. माझ्या आयुष्यात लाभलेल्या मार्गदर्शकांचा मी ऋणी आहे. या पुरस्काराचे श्रेय माझ्या सहकाऱ्यांना व रसिक प्रेक्षकांना देतो. माझ्या कार्याची दखल घेऊन सन्मान केल्याबद्दल मालवण तालुका पत्रकार समितीचा मनापासून आभारी आहे, असे त्यांनी नमूद केले.

या वेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई कमिटी अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक (मुळीक) परब, माजी जि. प. अध्यक्ष सौ. सरोज परब, साहित्यिका वैशाली पंडित, मालवण नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, पूनम चव्हाण, डॉ. अनिरुद्ध मेहेंदळे, छोटू ठाकूर, अर्चना कोदे, प्रफुल्ल देसाई, राजन परब, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ सचिव बाळ खडपकर, गुरुनाथ तिरपणकर, जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत, तालुका पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम आदी मान्यवर उपस्थित होते.





