मालवण (प्रतिनिधी) :
मालवण तालुका पत्रकार समितीने समाजातील विविध घटकांचा सन्मान करून चांगल्या कार्याची पोचपावती दिली आहे. पत्रकारांनी समाजाचा आरसा बनताना आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे. मालवण तालुक्यातील पत्रकारांच्या पाठीमागे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कायम उभा राहील, असे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केले.
मालवण तालुका पत्रकार समितीचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई कमिटी अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक (मुळीक) परब, माजी जि. प. अध्यक्ष सौ. सरोज परब, मालवण नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, पूनम चव्हाण, डॉ. अनिरुद्ध मेहेंदळे, छोटू ठाकूर, अर्चना कोदे, प्रफुल्ल देसाई, राजन परब, साहित्यिका वैशाली पंडित, तसेच जिल्हा पत्रकार संघ सचिव बाळ खडपकर, गुरुनाथ तिरपणकर, जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत, तालुका पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी प्रास्ताविक केले.
या वेळी छायाचित्रकार-पत्रकार गणेश गांवकर यांना स्व. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, पत्रकार सुधीर पडेलकर यांना स्व. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तर पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांना बेस्ट स्टोरी अवॉर्ड (मालवण पत्रकार समिती व अमित खोत पुरस्कृत) प्रदान करून गौरविण्यात आले. याशिवाय पत्रकार समितीतील सदस्य तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी गतवर्षी विविध क्षेत्रात मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल पत्रकार महेश सरनाईक, मुख्याध्यापिका शुभांगी अमित खोत, पोलीस पाटील प्राजक्ता झुंजार पेडणेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांचा ग्रुप डान्स तसेच दयानंद पेडणेकर यांचे कराओके गायन सादर झाले.
यावेळी तहसीलदार गणेश लव्हे म्हणाले, मालवण तालुक्यात रुजू झाल्यानंतर हा माझा पहिलाच कार्यक्रम असून, तालुक्यात लोकाभिमुख प्रशासनासाठी पत्रकारांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनीही पत्रकार प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा असून वंचित घटकांना न्याय देण्याचे कार्य पत्रकार करीत असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमात उद्योजक डॉ. दीपक परब, सौ. सरोज परब, राजन परब यांनीही आपले विचार मांडून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन संग्राम कासले यांनी केले तर आभार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





