मालवण (प्रतिनिधी) : अति मद्यपानाच्या सवयीपासून व्यक्तींना परावृत्त करून त्यांना समाजात सन्मानाने व आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारी अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस (अनामिक मद्यपी संघटना), मालवण ही संस्था गेली २५ वर्षे विनामूल्य सामाजिक कार्य करत आहे. या संस्थेच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त मालवण येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात तीन दिवसीय मोफत आरोग्य शिबिर (डिटॉक्स कॅम्प) आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर दि. ७, ८ व ९ जानेवारी २०२६ रोजी दररोज सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. या शिबिरामध्ये ज्यांना दारू पिणे सोडायची इच्छा आहे, रोज मद्यपान करण्याची सवय लागलेली आहे, तसेच हातापायांची थरथर, विचित्र भास होणे, मद्यपानामुळे झालेले शारीरिक व मानसिक दुष्परिणाम अशा समस्यांवर उपचार व मार्गदर्शन दिले जाणार आहे.
या शिबिरात रुग्णांना तीन दिवस मोफत औषधोपचार तसेच जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, अनुभवी ए. ए. (AA) बांधवांकडून समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मद्यपानमुक्त जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.
तरी गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय, मालवण (फोन : 02365-252032) किंवा ए. ए. सभासद मोबा. 9860436765, 7588906692 यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.





