मालवण (प्रतिनिधी) :
ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित लिखित ‘आगिनझाड’ या गाजलेल्या कथासंग्रहाच्या पंचविशी वर्षानिमित्त ‘आगिनझाड पंचविशी’ या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण यांच्या सहकार्याने तसेच ‘ऐलमा पेलमा अक्षर देवा’ – सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूहाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा रौप्य महोत्सव सोहळा रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथील दादासाहेब शिरोडकर सभागृहात संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर यांच्या हस्ते होणार असून, कथाअभिवाचन अॅड. अपर्णा परांजपे प्रभु करणार आहेत. ‘आगिनझाडचे मराठी साहित्यामधील योगदान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, त्यात सुप्रसिद्ध अनुवादक वंदना करंबळकर, कवयित्री अॅड. अपर्णा परांजपे प्रभु, नाट्य व चित्रपट अभिनेते अभय खडपकर आणि कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात साहित्यिक वैशाली पंडित यांची विशेष मुलाखत डॉ. ज्योती तोरस्कर घेणार आहेत. कार्यक्रमाच्या समारंभ अध्यक्षपदी मा. नमिता कीर राहणार आहेत.
या साहित्यिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी साने गुरुजी वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष डॉ. ज्योती बुवा तोरस्कर, बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त फडकेकर, कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर तसेच ‘ऐलमा पेलमा अक्षर देवा’ समूहाचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
या आगळ्यावेगळ्या साहित्यिक कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





