वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा आधारस्तंभ आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या विचारांची परंपरा जपत वारकरी संप्रदायाने समाजाला सदैव भक्ती, नीती आणि माणुसकीचा संदेश दिला आहे, असे प्रतिपादन प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले. दिनांक ०२/०१/२०२६ ते ०४/०१/२०२६ दरम्यान तीन दिवस चालणाऱ्या भव्य कीर्तन महोत्सवाचे भक्तिमय वातावरणात उद्घाटन झाले. यावेळी देसाई यांनी आपले विचार व्यक्त केले.
या महोत्सवात स्वामी शिवानंद आश्रम शेकीन हासुरचे मठाधिपती ह.भ.प. वेदांतचार्य उदय पाटील (शास्त्री), वासकर फड–पंढरपूरचे ह.भ.प. आनंद महाराज जाधव, तसेच श्री गुरु आजरेकर फड–पंढरपूरचे रायगड भूषण ह.भ.प. शिवम संदेश कदम यांची सुस्राव्य कीर्तने सादर होत आहेत.
या कीर्तनांना विणेकरी ह.भ.प. सावळाराम महाराज कुर्ले, मृदंगमणी श्री जगदीश महाराज पाटील व यश महाराज मांजरे तसेच गायनाचार्य ह.भ.प. विश्वनाथ महाराज गवंडळकर (जिल्हा वारकरी संप्रदाय अध्यक्ष) यांची साथ लाभत आहे. याशिवाय ह.भ.प. धनंजय महाराज ओलेकर, ह.भ.प. सोपानदेव महाराज तावडे, ह.भ.प. सूर्यकांत महाराज जोशी (सोन्सुरे), ह.भ.प. संतोष महाराज रेगडे (निळेली), ह.भ.प. प्रकाश डिचोलकर, ह.भ.प. त्रिमूर्ती महाराज सातार्डेकर (उभादांडा) यांचीही कीर्तने होणार आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन ह.भ.प. सावळाराम महाराज कुर्ले यांच्या हस्ते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रसन्ना देसाई, श्री सातेरी पंचायतन देवस्थानचे मानकरी श्री सुनील परब, नगरसेवक व वारकरी संप्रदायाचे श्री सदानंद गिरप, ज्येष्ठ वारकरी श्री जी.जी. साळगावकर, नगरसेवक श्री रविंद्र शिरसाट आणि वासकर फड–पंढरपूरचे चोपदार कडव महाराज यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व पूजन करून करण्यात आले.
यावेळी वारकरी संप्रदायाचे वसंत तांडेल, प्रतीक खानोलकर, शाम रेवणकर, प्रसाद गुरव, सतीश कदम, राजा वेंगुर्लेकर, अनिल मांजरेकर, श्याम सुंदर कोळंबकर, पंकज शिरसाठ, तसेच श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान–दाभोसचे पुजारी श्याम खोबरेकर, पूर्वेश तोरस्कर, रामेश्वर देवस्थानचे पुजारी गौरेश परब, भाई गुरव, श्याम प्रसाद गुरव, विनायक गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार वसंत तांडेल यांनी मानले. भक्तिरसात न्हालेल्या या कीर्तन महोत्सवामुळे परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.





