आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचार सभांचा धुरळा उडताना दिसत आहे. राज्यभरात विविध पक्षांकडून मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा, संयुक्त सभा तसेच जाहीर मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे.
काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांच्या याद्याही जाहीर केल्या असून, निवडणूक प्रचार आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक पक्ष आक्रमक रणनीती आखताना दिसत आहे.
दरम्यान, उद्या भाजप आणि शिवसेनेच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ होणार आहे. यानिमित्ताने मुंबईतील वरळी डोम येथे भव्य संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही एकाच व्यासपीठावरून महायुतीचा प्रचाराचा बिगुल वाजवणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, ठाकरे बंधूंकडूनही संयुक्त सभांचे आयोजन करण्यात येत असून, ५ जानेवारी रोजी पहिली संयुक्त सभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या सभेमुळे विरोधी आघाडीच्या प्रचारालाही वेग येण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्याआधीच्या काही दिवसांत राज्यात प्रचाराचा जोर आणखी वाढणार आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप, शक्तिप्रदर्शन आणि मतदारांचे मन जिंकण्यासाठी नेत्यांची धावपळ अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.





