अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोल्हापूर व मुंबई येथील पारंपरिक भजनी मंडळांच्या भावभक्तीपूर्ण भजन-गीतांनी नूतन वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. युवा नेतृत्व प्रथमेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबरच्या रात्री हा भक्तिमय कार्यक्रम संपन्न झाला.
३१ डिसेंबरच्या रात्री शेजारतीनंतर कोल्हापूर गंगावेश येथील उत्तम निगवेकर यांच्या ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळ, मगरमठी येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ तसेच दादर, मुंबई येथील स्वामी ओम भजनी मंडळ यांच्या भावभक्ती गीतांनी मंदिर परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला. रात्री १० ते पहाटे ४ या वेळेत सलग सुरू असलेल्या या कार्यक्रमाला हजारो स्वामी भक्तांनी हजेरी लावली.
३१ डिसेंबर रोजी रात्री ११.३० ते १२ या वेळेत उपस्थित हजारो भक्तांनी एकमुखाने श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केले. मध्यरात्री ठीक १२ वाजता असंख्य फटाक्यांच्या आतषबाजीत नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर भाविकांनी एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देत श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी सर्व भजनी मंडळांच्या प्रमुखांचा स्वामींचे कृपावस्त्र व प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पुढील कार्यक्रमांना सुरुवात झाली. रात्री १२ वाजता ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळाचे उत्तम निगवेकर व सहकाऱ्यांनी भावभक्ती गीते तसेच सोंगी भारुड सादर केले. श्री स्वामी समर्थ, हरी ओम स्वामी समर्थ, साई बाबा बोलो, अवलिया अवलिया, शंकर महाराजा, खंडेरायाच्या लग्नाला, अंजनीच्या सुता, शिर्डीवाले साईबाबा आदी भजन-गीतांच्या तालावर राज्यभरातून आलेल्या तसेच अक्कलकोट शहरातील अबालवृद्ध भक्तांनी भक्तीरसाचा मनमुराद आनंद घेतला.
नूतन वर्षानिमित्त पहाटे ५ वाजता काकड आरतीनंतर दिवसभर श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. नूतन वर्ष सुख-समृद्धीचे, आनंदाचे व भरभराटीचे जावो, यासाठी स्वामी समर्थांच्या चरणी भाविकांनी प्रार्थना केली. नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी श्री वटवृक्ष मंदिरात भाविकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली. सकाळी ६ वाजल्यापासून फत्तेसिंह चौकापर्यंत चौफेर गर्दी पसरली होती.
सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तसेच भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदिर विश्वस्त समितीचे चेअरमन महेश इंगळे तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये विशेष तळमळ असलेले त्यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे कर्मचारी, सेवेकरी व भजनी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


