महापालिका निवडणुकीत विविध पक्षांमध्ये झालेल्या युतीमुळे अनेक प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक ८९ मध्येही असाच पेच निर्माण झाला होता. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे या प्रभागात उमेदवारीचा प्रश्न चर्चेचा ठरला होता.
या प्रभागातून शिवसेना (उबाठा) कडून खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, या प्रभागावर मनसेचे सक्रिय कार्यकर्ते संतोष उप्रलकर हे देखील इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे युतीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८९ मध्ये उमेदवारीचा तिढा निर्माण झाला होता.
या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर संतोष उप्रलकर यांनी पक्षशिस्त पाळत आपली उमेदवारी मागे घेतली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीला बाधा येऊ नये आणि महापालिका निवडणुकीत एकत्रित ताकद उभी राहावी, या व्यापक राजकीय भूमिकेतून उप्रलकर यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक ८९ मध्ये आता गीतेश राऊत यांचा मार्ग मोकळा झाला असून, युतीच्या राजकारणात अनेक इच्छुकांना माघार घ्यावी लागत असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.






