महायुतीतील शिवसेना–भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्तेकडे वाटचाल अधिक वेगवान होताना दिसत आहे. विविध महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीने अवलंबलेला बिनविरोध निवडींचा पॅटर्न हा विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरत असून, राजकीय समीकरणे महायुतीच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र आहे.
कल्याण–डोंबिवली, भिवंडी, धुळे, जळगाव, पनवेल व अहिल्यानगर या महत्त्वाच्या भागांत महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने युतीची संघटनात्मक ताकद अधोरेखित झाली आहे. विशेषतः भाजप आणि शिवसेनेचा समन्वय, तसेच राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा सहभाग यामुळे महायुतीचा विस्तार अधिक व्यापक होत आहे.
भाजपकडून कल्याण–डोंबिवलीत मंदा पाटील, रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर, भिवंडीत सुमित पाटील, धुळ्यात सुरेखा उगले, उज्वला भोसले, ज्योत्सना पाटील, जळगावात उज्वला बेंडाळे, तर पनवेलमध्ये नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
शिवसेनेकडून जळगावात गौरव सोनवणे, मनोज चौधरी, तसेच कल्याण–डोंबिवलीत रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी, हर्षल मोरे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
तर अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून कुमार वाकळे आणि प्रकाश भागानगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या घडामोडींमुळे महायुतीने केवळ निवडणूक गणितच नव्हे तर राजकीय मनोबलातही मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. बिनविरोध निवडींचा वाढता आकडा पाहता, येत्या काळात महायुतीची सत्ता अधिक मजबूत होण्याचे संकेत राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.





