वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गाऊडवाडी येथील मूळ रहिवासी डॉ. प्रफुल्ल बाबाजी गोडकर यांना कोकण राज्य अभियानातर्फे मुंबई येथे आयोजित समारंभात कोकणरत्न पदवी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
हा पुरस्कार वितरण सोहळा कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली, तर पत्रकार व संपादक सचिन कळझुणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. डॉ. प्रफुल्ल गोडकर हे गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिशा मिळावी या उद्देशाने त्यांनी अनेक मार्गदर्शक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आजवर असंख्य विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे.
सन २०२२ च्या कोरोना काळात बॅ. नाथ पै सेवांगण या सामाजिक संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या विविध आरोग्य शिबिरांसाठी डॉ. गोडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. याशिवाय कोकण परिसरातील अनेक सामाजिक संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीचे कार्य ते अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहेत.
विशेष म्हणजे डॉ. गोडकर हे दरवर्षी डिसेंबर महिन्यात नियमितपणे मालवण येथे येऊन गरजू व होतकरू नागरिकांना आपल्या वैद्यकीय सेवेचा लाभ देत असतात. त्यांच्या या निस्वार्थ आणि समाजोपयोगी कार्याची दखल घेतच त्यांना कोकणरत्न पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.





