मालवण, दि. प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिंदे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या थेट नगराध्यक्षा व १० नगरसेवकांनी एकत्र येत ‘श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी’ या नव्या गटाची स्थापना केली आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र व ठरावाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली असून, या गटास अधिकृत मान्यता देण्याची विनंती करण्यात आली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मालवण नगरपालिकेत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे ११ नगरसेवक निवडून आणत राज्याच्या राजकारणाचं लक्ष वेधून घेतलं होतं.
नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मालवण नगरपरिषदेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच तांत्रिक कारणांमुळे हा स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या आघाडीच्या गटनेत्या म्हणून पूनम चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे नगरपालिकेतील सत्तासमीकरणे अधिक स्पष्ट झाली असून, शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.
या आघाडीत थेट नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह दिपक पाटकर, निना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, पूनम चव्हाण, सहदेव बापर्डेकर, अश्विनी कांदळकर, मेघा गावकर, शर्वरी पाटकर, महेश कोयंडे आणि भाग्यश्री मयेकर यांचा समावेश असून, सर्व ११ सदस्यांनी गट स्थापनेच्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
शहरातील प्रलंबित विकासकामांना गती देणे, तसेच प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणणे, हा या आघाडीच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे गटनेत्या पूनम चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. गट स्थापन केल्याबाबतचे पत्र नगरविकास विभाग जिल्हा प्रशासन सहायक विनायक औंधकर यांच्याकडे सादर करण्यात आले असून, या प्रक्रियेस सर्व ११ नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दर्शविला आहे.





