मालवण (प्रतिनिधी):
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांच्यातर्फे क्षेत्रीय शिक्षा संस्थान (आर.आय.ई.) श्यामला हिल्स, भोपाळ (मध्यप्रदेश) येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात मालवण तालुक्यातील रामगड येथील प्रगत विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ओमतेज उल्हास तारी व तन्मय बाबु परब या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत सादर केलेल्या ‘Waste is Best’ या अभिनव प्रतिकृतीला महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रतिकृतीचा मान मिळाला असून, सदर प्रतिकृतीस पेटंटसाठी नोंदणीचा सन्मान देखील प्राप्त झाला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक आणि प्रशालेचा NCERT तर्फे सन्मानचिन्ह, सुवर्णपदके (गोल्ड मेडल्स) व प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे संस्था अध्यक्ष वा. स. प्रभुदेसाई, उपाध्यक्ष सु. रा. तळवडेकर, सचिव वि. म. मटकर, सहसचिव डी. डी. वाघ, खजिनदार विजय कुवळेकर, संस्था संचालक अभय प्रभुदेसाई, सुभाष धुरी, ज्ञानदेव जाधव, तातोबा घाडीगांवकर, मोहन घाडीगांवकर, वसंत हाटले, घनश्याम चव्हाण, गोपीनाथ लाड, नरहरी परुळेकर, नरेंद्र हाटले, मुख्याध्यापिका सौ. डि. टी. पेडणेकर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.





