मालवण | प्रतिनिधी
मालवण शहरातील देऊळवाडा–आडारी रोड परिसरात वारंवार कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांच्या घरातील व दुकानातील विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या भागात तात्काळ थ्री फेज वीज लाईन बसविण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश चव्हाण यांच्यासह स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या परिसरात सध्या होणारा वीजपुरवठा अपुरा व अस्थिर असून, अनेकदा वीज खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक विद्युत उपकरणे जळून खराब होत असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
देऊळवाडा–आडारी रोड परिसरात वीज ग्राहकांची संख्या अधिक असून सध्याची व्यवस्था अपुरी ठरत आहे. त्यामुळे वीज अभियंत्यांनी तात्काळ पाहणी करून थ्री फेज लाईन बसवावी, जेणेकरून वीजपुरवठा सुरळीत व स्थिर होईल, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी उमेश चव्हाण यांच्यासह मनोहर मालवणकर, संदीप मालवणकर, मयुरी देऊलकर, संतोष चव्हाण, विरेश किर, गणेश मुंबरकर, अरुण मुंबरकर आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.





