मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरातील सागरी महामार्गावर दोन दिवसांपूर्वी वाळू वाहतूक करणारे डंपर नागरिकांनी अडविल्याच्या घटनेवरून आता राजकीय वाद चिघळला आहे. सदर डंपर महसूल प्रशासनाने ताब्यात घेतले असताना, नागरिकांनी खंडणी उकळण्याच्या उद्देशाने बळजबरीने डंपर अडविले, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. वाळू वाहतूक रोखणे हे महसूल विभाग व पोलीस यांचे काम असताना नागरिकांकडून असे प्रकार होणे लोकशाहीस घातक असल्याचे सांगत, संबंधित खंडणीखोर नागरिकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार प्रिया हरणे तसेच पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सागरी महामार्गावर काही नागरिकांनी अनधिकृत वाळू वाहतुकीचा आरोप करत डंपर अडवून महसूल व पोलीस विभागाला पाचारण केले होते. त्यानंतर महसूल विभागाने अनधिकृत वाळू वाहतुकीच्या संशयावरून गोवा पासिंगचे सहा डंपर ताब्यात घेतले होते.
यावेळी बोलताना शिवसेना मालवण शहरप्रमुख तथा नगरसेवक दीपक पाटकर म्हणाले की, “सागरी महामार्गावर गोवा पासिंगचे डंपर तीन नागरिकांनी खंडणीच्या उद्देशाने अडविले. चालकांकडे खंडणीची मागणी करण्यात आली. पैसे नसल्याने चालकांनी नकार दिल्यानंतर महसूल व पोलीसांना बोलावून अनधिकृत वाळू वाहतुकीचा कांगावा करण्यात आला. वाळू वाहतूक रोखणे हे महसूल व पोलिसांचे संयुक्त कर्तव्य असताना, गुंड प्रवृत्तीचे लोक दारू पिऊन गाड्या अडवतात, चालकांना धमकावतात, मारहाण करतात व शहरातील शांतता भंग करतात. हे लोकशाहीस घातक असून, त्या तिन्ही व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
बळजबरीने डंपर अडवून मालवण शहरातील शांतता भंग करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. राजकीय हेतूने समाज विघातक कृत्ये केली जात असून, डंपर चालकांना धमकावणे, खंडणी मागणे, शांतता भंग करणे अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला.
यावर नायब तहसीलदार प्रिया हरणे यांनी संबंधित मागणी वरिष्ठांकडे मांडून त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, वाळू व्यावसायिक व देवलीचे सरपंच श्याम वाक्कर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक माफिया नसून ते कायदेशीर टेंडर घेऊन शासनाच्या नियमांनुसार व्यवसाय करतात. गावातील अडचणींना मदत करणारे वाळू व्यावसायिकच असतात. अशा परिस्थितीत वाळू वाहतूक करणारे डंपर जबरदस्तीने अडविणे चुकीचे असून, अशा प्रकारांचा आम्ही निषेध करतो. प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी.”
यावेळी बबन शिंदे, राजा गांवकर, विश्वास गांवकर, सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, शर्वरी पाटकर, पूनम चव्हाण, मेघा सावंत, नीना मुंबरकर, हरीश गांवकर, श्याम वाक्कर, राजू बिडये, भाई मांजरेकर, बाळू नाटेकर, मोहन वराडकर, शेखर गाड, नरेश हुले, किसन मांजरेकर, भाऊ मोर्जे, महेश सारंग, संदीप भोजने, तेजस लुडबे, निकित वराडकर, सुशील शेडगे, बाबा मोरजकर, आबा शिर्सेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व वाळू व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





