मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत आनंदव्हाळ–कर्लाचाव्हाळ यांच्या वतीने आज कदमवाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा यशस्वीपणे बांधण्यात आला. जलसंधारणाचे महत्त्व ओळखून तसेच गावातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांनी श्रमदानातून हा बंधारा पूर्ण केला.
या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या वनराई बंधाऱ्यामुळे परिसरातील भूजलपातळी वाढण्यास मदत होणार असून शेतीसाठी तसेच जनावरांच्या पाण्याच्या गरजांसाठी हा बंधारा उपयुक्त ठरणार आहे.
हा उपक्रम सरपंच रश्मी रवींद्र टेंबुलकर आणि उपसरपंच दिलीप गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण सरमळकर, कर्मचारी विजय चव्हाण, केंद्र चालक प्रिशा बांदल, ग्रामपंचायत सदस्य अनिल सुकाळी, माजी सरपंच रवींद्र टेंबुलकर, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत घाटगे, पाणी कर्मचारी अनंत नांदोसकर आदी उपस्थित होते.
बंधाऱ्याच्या उभारणीसाठी गावातील तरुण व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने श्रमदान केले. यामध्ये रमेश बांदल, दुर्गेश परब, गौरव कदम, मनोहर बांदल, लाजरी परब, चिन्मय परब, तनिष बांदल यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. “लोकसहभागातून ग्रामविकास” हे ब्रीदवाक्य या उपक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने साकार झाल्याची भावना सरपंच रश्मी टेंबुलकर यांनी यावेळी व्यक्त केली.





