मालवण/प्रतिनिधी :
वाचन, लेखन, मनन, चिंतन आणि मेहनत या पंचसूत्रीबरोबरच अंगभूत कौशल्यांचा व आकलनशक्तीचा विकास करून वेळेचे योग्य नियोजन केल्यास स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण नाही, असे मार्गदर्शन मुख्यमंत्री यांचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांनी केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचनालयाचे निवृत्त उपसंचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, मुख्याध्यापक हणमंत तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, प्रशालेच्या विद्यार्थी मुख्यमंत्री वेदिका बिरमोळे, ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी प्रतिनिधी सुदीप घाडी, शिक्षक-पालक संघाच्या पदाधिकारी सौ. सुमन आडवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक हणमंत तिवले यांनी स्वागत केले, तर प्रास्ताविक आर. डी. बनसोडे यांनी मांडले. मान्यवरांचा परिचय सौ. सरोज बांदेकर यांनी करून दिला, तर वार्षिक अहवालाचे वाचन आर. बी. देसाई व सौ. वाक्कर यांनी केले.
मार्गदर्शन करताना सतीश लळीत म्हणाले की, स्पर्धा परीक्षा हा विषय फक्त शहरात राहणाऱ्या, महागडे क्लास लावणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहे, असा गैरसमज आहे. मात्र तो पूर्णतः चुकीचा आहे. योग्य नियोजन, शिस्तबद्ध अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही या परीक्षांमध्ये यश मिळवू शकतात. प्रशासकीय सेवेत कोकणी टक्का कमी असण्यामागे पुरेशी जागृती नसणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. प्रशासकीय सेवा वैयक्तिक विकासाबरोबरच समाजसेवेची मोठी संधी देतात. त्यामुळे किमान आठवीपासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने तयार करण्यासाठी शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि पालकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, पूर्व व मुख्य परीक्षा तसेच मुलाखत प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात साबाजी करलकर यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सामान्य ज्ञान वाढीसाठी सातत्याने वाचन करावे, असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष स्व. नि. ल. मिठबावकर यांच्या संकल्पनेतून देण्यात येणारा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड तसेच भंडारी ए. सो. हायस्कूल माजी विद्यार्थी युवा संघटनेतर्फे देण्यात येणारा स्व. रघुनाथ टेमकर स्मृतीप्रित्यर्थ आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रथमेश चव्हाण याला प्रदान करण्यात आला. तसेच संस्थेतर्फे देण्यात येणारा ज्युनियर कॉलेज आदर्श विद्यार्थी पुरस्कार पार्थ मेस्त्री याला देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.






