मालवण | प्रतिनिधी
पळसंब येथे आयोजित आचरा मॅनेजमेंट स्टडीज, आचरा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) श्रमसंस्कार शिबिरात “यशाची गुरुकिल्ली” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले. हे व्याख्यान स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. हंबीरराव चौगुले यांनी दिले.
या व्याख्यानात प्रा. चौगुले यांनी विद्यार्थ्यांना यश म्हणजे काय, ते कसे मिळवता येते, यशस्वी होण्यासाठी आवश्यक सवयी, सातत्य, ध्येय निश्चिती आणि आत्मविश्वासाचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यशस्वी व्यक्तींची उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर आचरा मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. नितेश सारंग, प्रा. कांबळी, प्रा. सौ. दुखंडे आणि प्रा. सौ. मुणगेकर उपस्थित होते. व्याख्यानादरम्यान प्रा. चौगुले यांनी MPSC व UPSC स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठीची तयारी, अभ्यासाचे नियोजन आणि शिस्तबद्ध अभ्यासपद्धती याबाबतही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रमसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांनी केले. या एनएसएस शिबिरात ४५ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शिबिरादरम्यान विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले असून, पळसंब परिसरात विद्यार्थ्यांनी तीन बंधारे बांधण्याचे श्रमदानाचे कार्यही यशस्वीपणे पार पाडले.
या शिबिरात अन्य मान्यवर व्याख्यात्यांचीही व्याख्याने संपन्न झाली असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबिर उपयुक्त ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.






