मालवण नगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांनी आपला पराभव अत्यंत खिलाडूवृत्तीने स्वीकारत सर्व मालवणवासीयांचे आभार मानले असून ‘शत प्रतिशत कृतज्ञता’ व्यक्त केली आहे. “आकडे किंवा संख्यात्मक विजयापेक्षा मालवणच्या जनतेशी जोडले गेलेले नाते माझ्यासाठी अधिक मोलाचे आहे,” अशी भावना व्यक्त करत त्यांनी पुढील काळातही जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रिय राहण्याचा निर्धार जाहीर केला आहे.
नगरपालिका निवडणूक निकालानंतर प्रसिद्धीपत्रकाद्वारे सौ. खोत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तब्बल नऊ वर्षांनंतर मालवणमध्ये लोकशाहीचा मोठा उत्सव पार पडला, असे नमूद करत त्यांनी गेल्या साडेतीन वर्षांत प्रशासकीय कामकाजाच्या माध्यमातून आणि निवडणूक प्रक्रियेदरम्यान जनसामान्यांच्या समस्या, गरजा तसेच आनंद-दुःख जवळून अनुभवता आल्याचे सांगितले. “जनतेने मला दिलेला संयमी आत्मविश्वास हा माझ्यासाठी सर्वात मोठा दागिना आहे,” असे त्या म्हणाल्या.
नगराध्यक्ष पदाचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नसला तरी, या संपूर्ण प्रवासाने आगामी काळातील सकारात्मक घडामोडींची मुहूर्तमेढ रोवली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “निवडणूक म्हणजे प्रेम किंवा युद्ध नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याची ती एक शक्ती आहे. जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास मला भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा देईल,” असेही त्यांनी नमूद केले.
‘आकाशापल्याड आणखी आकाश आहे’ या जाणिवेत उगवत असलेल्या नव्या पर्वासाठी आपण सज्ज असल्याचे सांगत समाजकारणातून राजकारणाकडे जाताना आलेल्या अनुभवांनी आपली क्षमता अधिक प्रगल्भ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आणि मतदारांचे आभार मानताना त्यांनी पुन्हा एकदा ‘शत प्रतिशत कृतज्ञता’ व्यक्त केली. मालवणच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढेही आपण सदैव सक्रिय राहणार असल्याचा निर्धार सौ. शिल्पा खोत यांनी व्यक्त केला आहे.






