मालवण (प्रतिनिधी) – लोकशाहीत जनतेने दिलेला कौल हा केवळ विजयाचा उत्सव नसून जबाबदारीची जाणीव करून देणारा असतो. मालवण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग ९ ब मधून भाजपच्या उमेदवार सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांनी मिळविलेला विजय हाच विश्वासाचा कौल मानावा लागेल. “माझा प्रभाग हा माझा परिवार आहे,” या भावनेतून त्यांनी व्यक्त केलेली भूमिका ही येणाऱ्या काळातील कार्यपद्धतीची दिशा स्पष्ट करणारी आहे.
नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत नागरी सुविधा यांसह सर्वसमावेशक विकासावर भर देण्याचा त्यांचा संकल्प प्रभागातील नागरिकांसाठी आश्वासक ठरतो. जनतेने दाखविलेला विश्वास हा आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती असल्याचे सांगत, तो विश्वास भविष्यात अधिक दृढ करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या विजयामागे भाजप नेतृत्वाचा विश्वास, मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांची मेहनत महत्त्वाची ठरली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सौ. आचरेकर यांनी पक्षाने दिलेल्या संधीचे सोनं करण्याचा आत्मविश्वास दाखविला.
प्रभाग ९ च्या मतदारांनी दिलेला कौल हा विकासाभिमुख राजकारणाला मिळालेला पाठिंबा मानावा लागेल. आता या विश्वासाचे रूपांतर प्रत्यक्ष कामातून दिसून येईल, हीच अपेक्षा नागरिकांची आहे. लोकसहभाग, पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण विकास या त्रिसूत्रीवर वाटचाल झाली, तर प्रभाग ९ निश्चितच आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





