मालवण नगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, राज्यातील सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत राजकीय संघर्षाचे प्रत्यक्ष प्रतिबिंब ठरली. भाजप आणि शिंदे शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असतानाही मालवणमध्ये मात्र एकमेकांविरोधात उभे ठाकले. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ मालवणच नव्हे, तर संपूर्ण जिल्हा आणि राज्याचे लक्ष लागले होते.
नगराध्यक्ष पदाचा निकाल : शिवसेनेची सरशी
नगराध्यक्ष पदाच्या तिरंगी लढतीत शिंदे शिवसेनेच्या ममता मनमोहन वराडकर यांनी सुमारे १०२२ मतांच्या फरकाने विजय मिळवत स्पष्ट आघाडी घेतली. उबाठा शिवसेनेच्या पूजा करलकर यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर भाजपच्या शिल्पा खोत या थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या जाणे हा भाजपसाठी मोठा धक्का मानावा लागेल. ही बाब भाजपच्या स्थानिक संघटनात्मक मर्यादा अधोरेखित करणारी ठरली.
नगराध्यक्ष पदाचा निकाल : शिंदे शिवसेनेची सरशी
नगराध्यक्ष पदाच्या तिरंगी लढतीत शिंदे शिवसेनेच्या ममता मनमोहन वराडकर यांनी सुमारे १०२२ मतांच्या फरकाने विजय मिळवत स्पष्ट आघाडी घेतली. उबाठा शिवसेनेच्या पूजा करलकर यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर भाजपच्या शिल्पा खोत या थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या जाणे हा भाजपसाठी मोठा धक्का मानावा लागेल. ही बाब भाजपच्या स्थानिक संघटनात्मक मर्यादा अधोरेखित करणारी ठरली.
महायुतीतील संघर्षाचा थेट फटका भाजपला
या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत संघर्षाचा सर्वाधिक फटका भाजपला बसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अनेक प्रभागांत भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट मतविभागणी झाली. त्याचा फायदा काही ठिकाणी उबाठा शिवसेनेला, तर बहुतेक ठिकाणी शिंदे शिवसेनेला झाला. अंतिम निकाल पाहता शिंदे शिवसेनेने दहा जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले, तर भाजप केवळ पाच जागांवर अडकला.
शिंदे शिवसेनेची संघटनात्मक ताकद
प्रभागनिहाय निकालांचा अभ्यास केल्यास शिंदे शिवसेनेची मजबूत संघटनात्मक पकड दिसून येते. अनेक प्रभागांत नवख्या उमेदवारांनी अनुभवी माजी नगरसेवकांना पराभूत केले. प्रभाग ६ अ मधील सहदेव बापर्डेकर यांचा विजय किंवा ६ ब मधील अश्विनी कांदळकर यांचा महिला लढतीतील विजय हे त्याचे ठळक उदाहरण ठरले. कार्यकर्त्यांची एकजूट, स्थानिक नेतृत्वावर विश्वास आणि प्रभावी प्रचार याचा थेट फायदा शिंदे शिवसेनेला झाला.
उबाठा शिवसेना : मर्यादित यश
उबाठा शिवसेनेने चार जागा जिंकत अस्तित्व टिकवले असले तरी, अपेक्षित कामगिरी करण्यात ती कमी पडली. काही प्रभागांत लढत अटीतटीची झाली, तर काही ठिकाणी मतदारांनी स्पष्टपणे दुसरा पर्याय निवडल्याचे दिसले. नगराध्यक्ष पदाचा पराभव हा उबाठा गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
अपक्ष सुदेश आचरेकर : वैयक्तिक प्रभाव कायम
सलग दुसऱ्यांदा अपक्ष म्हणून निवडून आलेले माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर हे या निवडणुकीतील वेगळे समीकरण ठरले. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन वैयक्तिक संपर्क, अनुभव आणि स्थानिक विश्वासाच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. हा विजय स्थानिक राजकारणात व्यक्तिकेंद्री प्रभाव अजूनही महत्त्वाचा असल्याचे दाखवतो.
प्रभागनिहाय राजकीय समीक्षण
मालवण नगरपालिका निवडणूक ही केवळ आकड्यांची लढत न राहता, स्थानिक नेतृत्व, पक्षीय संघर्ष, बंडखोरी आणि मतदारांचा बदलता कौल यांचे जिवंत प्रतिबिंब ठरली. प्रत्येक प्रभागाचा निकाल वेगळी राजकीय कथा सांगणारा असून, एकत्रित चित्र पाहिले तर शिंदे शिवसेनेचा संघटनात्मक विजय स्पष्टपणे दिसून येतो.
प्रभाग १ : भाजपची ठोस पकड
प्रभाग १ अ मध्ये भाजपचे मंदार केणी यांनी शिंदे शिवसेनेच्या उमेदवारावर मोठ्या फरकाने विजय मिळवला. येथे भाजपची बूथपातळीवरील तयारी आणि मतदारांशी थेट संपर्क निर्णायक ठरला. काँग्रेसची मतसंख्या अत्यल्प राहणे हे महाविकास आघाडीच्या मर्यादेचे द्योतक ठरले. प्रभाग १ ब मध्ये दर्शना कासवकर यांचा विजय हा वैयक्तिक कामगिरी आणि भाजप ब्रँड यांचा संगम मानावा लागेल. दोन्ही शिवसेना गटांतील मतविभागणीचा त्यांना स्पष्ट फायदा झाला
प्रभाग १ अ मधून भाजपच्या मंदार केणी यांनी ६३९ मते मिळवत शिंदे शिवसेनेच्या वसंत देवेंद्र गांवकर यांचा २७१ मतांनी पराभव केला. वसंत गांवकर यांना ३६८ मते मिळाली. याच प्रभागात निवडणूक लढविणाऱ्या महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संदेश कोयंडे यांना ८४ मते मिळाली. या प्रभागात नोटा ची संख्या १७ आहे. प्रभाग १ ब मधून माजी नगरसेविका दर्शना नामदेव कासवकर या विजयी झाल्या. त्यांना ४९६ मते मिळाली. तर उबाठा शिवसेनेच्या पूजा पृथ्वीराज जोगी यांना ३०२ आणि शिंदे शिवसेनेच्या देवयानी सुरेश शिर्सेकर यांना २९३ मते मिळाली. दर्शना कासवकर या १९४ मतांनी विजयी झाल्या आहेत.
प्रभाग २ : भाजप विरुद्ध उबाठा शिवसेना
प्रभाग २ अ मध्ये भाजपचे ललित चव्हाण यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. शिंदे शिवसेनेची तिसऱ्या क्रमांकाची भूमिका भाजपच्या विजयाला पूरक ठरली.मात्र २ ब मध्ये चित्र उलटले. येथे ठाकरे शिवसेनेच्या अनिता गिरकर यांनी भाजपचा पराभव केला. हा प्रभाग ठाकरे गटाचा पारंपरिक प्रभाव दर्शवणारा ठरला.
प्रभाग २ मधून भाजपचे ललित हरी चव्हाण यांनी ठाकरे शिवसेनेच्या उमेश पुरुषोत्तम मांजरेकर यांचा ३०७ मतांनी पराभव केला. चव्हाण यांना ५७६ तर मांजरेकर यांना २६९ मते मिळाली. शिंदे शिवसेनेचे महेश सारंग यांना २४५ मते मिळाली. प्रभाग २ ब मधून ठाकरे शिवसेनेच्या अनिता पॉली गिरकर यांनी भाजपच्या अमृता अनिकेत फाटक यांचा १३६ मतांनी पराभव केला. सौ. गिरकर यांना ४७० मते तर अमृता फाटक ३३४ मते मिळाली. शिंदे शिवसेनेच्या पूजा मंगेश मांजरेकर या २७८ मते मिळवीत तिसऱ्या स्थानावर राहिल्या.
प्रभाग ३ : शिंदे शिवसेनेचा अनुभव कामी
३ अ आणि ३ ब दोन्ही प्रभागांत शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली. माजी नगरसेवकांचा अनुभव, स्थानिक कामांची आठवण आणि संघटनात्मक ताकद यामुळे शिंदे गट येथे वरचढ ठरला. भाजप आणि उबाठा शिवसेनेतील मतविभागणी निर्णायक ठरली.
प्रभाग ३ अ मधून माजी नगरसेवक आणि शिंदे शिवसेनेचे उमेदवार दीपक गणपत पाटकर यांनी ४८६ मते मिळवीत विजय मिळविला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ठाकरे शिवसेनेचे उमेश चव्हाण यांना २२० मते मिळाली. चव्हाण यांचा पाटकर यांनी २६६ मतांनी पराभव केला. या प्रभागात निवडणूक लढविणारे भाजपचे माजी नगरसेवक पंकज श्रीरंग सादये यांना १३८ मते मिळाली. प्रभाग ३ ब मधून शिंदे शिवसेनेच्या उमेदवार आणि माजी नगरसेविका नीना गोविंद मुंबरकर यांनी २६ मतांनी विजय मिळविताना ३२९ मते मिळविली. त्यांनी भाजपच्या सुवर्णा सुहास वालावलकर (३०३) यांचा पराभव केला. ठाकरे शिवसेनेच्या योगिता योगेंद्र गांवकर यांना २०८ मते मिळाली.
प्रभाग ४ : अटीतटीची पण शिंदे गटाची सरशी
४ अ मध्ये दोन्ही गटांतील शिवसेना आमनेसामने असताना शिंदे गटाने बाजी मारली. येथे भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहणे हे पक्षासाठी चिंतेचे लक्षण आहे. महिला उमेदवारांच्या लढतीतही शिंदे शिवसेनेचा विजय म्हणजे महिलांमधील पक्षविश्वास वाढल्याचे संकेत मानले जात आहेत.
प्रभाग ४ अ मधून शिंदे शिवसेनेचे सिद्धार्थ मनोहर जाधव यांनी ठाकरे शिवसेनेच्या सुमित काशिनाथ जाधव यांचा ४० मतांनी पराभव केला. सिद्धार्थ जाधव यांना ३१२ मते तर सुमित जाधव यांना २२७ मते मिळाली. भाजपच्या रोहन रजनीकांत पेंडुरकर यांना १९७ मते मिळाली. याच प्रभागात शिंदे शिवसेनेच्या पूनम नागेश चव्हाण भाजपच्या माजी नगरसेविका संतोषी संतोष कांदळकर यांचा १२२ मतांनी पराभव केला. पूनम चव्हाण यांना ३८६ मते तर संतोषी कांदळकर यांना २६४ मते मिळाली. ठाकरे शिवसेनेच्या वृंदा गजानन गवंडी यांना १३० मतांवर समाधान मानावे लागले.
प्रभाग ५ : अनुभव विरुद्ध पक्ष
५ अ मध्ये तीन माजी नगरसेवकांची लढत झाली. येथे पक्षापेक्षा उमेदवाराचा वैयक्तिक प्रभाव महत्त्वाचा ठरला. ५ ब मध्ये भाजपने काँग्रेसला स्पष्ट पराभूत करत महाविकास आघाडीची मर्यादा उघडी पाडली.
प्रभाग ५ अ मधून यतीन परशुराम खोत यांचा माजी नगरसेवक महेंद्र सुदाम म्हाडगुत यांनी ४८ मतांनी पराभव केला. म्हाडगुत यांना ४४८ मते तर यतीन खोत यांना ४०० मते मिळाली. शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक विलास गणपत मुणगेकर यांना १०५ मते मिळाली. विशेष म्हणजे या प्रभागात तीन माजी नगरसेवकांची लढत होती. प्रभाग ५ ब मधून भाजपच्या माजी नगरसेविका महानंदा किशोर खानोलकर यांनी ४५५ मते मिळवीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अमृता अरविंद मोंडकर यांचा १७७ मतांनी पराभव केला. सौ. मोंडकर यांना २७७ मते मिळाली. या प्रभागात शिंदे शिवसेनेच्या नंदिता धोंडू वरवडेकर यांना २०६ मते मिळाली.
प्रभाग ६ : नवख्या उमेदवारांचा उदय
६ अ मध्ये शिंदे शिवसेनेच्या नवख्या उमेदवाराने दोन दिग्गजांना पराभूत करणे हा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट मानावा लागेल. यामुळे “नवीन चेहऱ्यांना संधी” ही शिंदे शिवसेनेची रणनीती यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले.६ ब मध्येही महिला नवख्या उमेदवाराचा विजय हेच अधोरेखित करतो
प्रभाग ६ अ मधून निवडणूक लढविणारे माजी नगरसेवक चंद्रशेखर रजनीकांत कुशे आणि माजी उपनगराध्यक्ष व उबाठा शिवसेनेचे महेश जावकर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या प्रभागात शिंदे शिवसेनेचे सहदेव नीलकंठ बापर्डेकर या नवख्या उमेदवाराने ५४६ मते मिळवीत कुशे आणि जावकर द्वयीचा पराभव केला. महेश जावकर यांना ३६३ मते तर चंद्रशेखर कुशे यांना २३४ मते मिळाली. बापार्डेकर यांनी १८४ एवढे मताधिक्य घेत विजय मिळविला. प्रभाग ६ ब मध्ये तीन नवख्या महिला उमेदवारांमध्ये लढत झाली. या लढतीत शिंदे शिवसेनेच्या अश्विनी अनिल कांदळकर ४८६ मते घेत बाजी मारली. त्यांनी भाजपच्या महिमा महेश मयेकर (३३९ मते) यांचा पराभव केला. सौ. मयेकर यांना १४७ मतांनी पराभव पत्करावा लागला. उबाठा शिवसेनेच्या स्मिता संतोष सरमळकर यांना २९४ मते मिळाली.
प्रभाग ७ : व्यक्तिकेंद्री राजकारण
७ अ मध्ये अपक्ष सुदेश आचरेकर यांचा निसटता पण महत्त्वपूर्ण विजय हा पक्षीय राजकारणापेक्षा वैयक्तिक संपर्क आणि विश्वास अजूनही प्रभावी असल्याचे दाखवतो. ७ ब मध्ये चार मतांचा फरक हा प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.
प्रभाग सात अ मधून माजी नगराध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार सुदेश सुबोध आचरेकर यांनी ४३६ मते मिळवीत भाजपच्या सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांचा अवघ्या २० मतांनी पराभव केला. या प्रभागात चौरंगी लढत झाली. शिंदे शिवसेनेच्या नरेश चंद्रकांत हुले यांना १९६ मते तर ठाकरे शिवसेनेच्या तेजस मोतीराम नेवगी यांना ११४ मते मिळाली. प्रभाग ७ ब मधून मेघा उपेंद्र गांवकर यांनी ठाकरे शिवसेनेच्या गौरी तुळशीदास मयेकर यांच्यावर ४ मतांनी निसटता विजय मिळविला. मेघा गांवकर यांना ३८९ मते तर गौरी मयेकर ३८५ मते मिळाली. भाजपाच्या दिपाली दिलीप वायंगणकर यांना ३६९ मते मिळाली.
प्रभाग ८ : ठाकरे गटाची ताकद आणि शिंदे गटाची तोलामोलाची कामगिरी
८ अ मध्ये ठाकरे शिवसेनेचा मोठा विजय हा गटासाठी दिलासादायक ठरला. मात्र ८ ब मध्ये शिंदे शिवसेनेने पुन्हा वर्चस्व सिद्ध केले. येथे काँग्रेसची मतसंख्या निर्णायक ठरण्यात अपयशी ठरली.
प्रभाग ८ अ मधून ठाकरे शिवसेनेच्या मंदार सुहास ओरसकर यांनी भाजपच्या संतोष मधुकर शिरगांवकर यांचा २३६ मतांनी पराभव केला. मंदार ओरसकर यांना ५२५ मते तर संतोष शिरगांवकर यांना २८९ मते मिळाली. शिंदे शिवसेनेचे राजेंद्र सदानंद परुळेकर १७५ मते मिळवीत तिसऱ्या स्थानावर राहिले. प्रभाग ८ ब मधून माजी उपगराध्यक्ष शिंदे शिवसेनेच्या उमेदवार शर्वरी शैलेंद्र पाटकर यांनी विजय मिळविताना भाजपच्या मरीना मोतेस फर्नांडिस यांचा ५६ मतांनी पराभव केला. शर्वरी पाटकर ३८१ मते तर मरीना फर्नांडिस यांना ३२५ मते मिळाली. काँग्रेसच्या रुपाली श्रीधर सकपाळ यांना २६८ मते मिळाली.
प्रभाग ९ : भाजप–शिंदे शिवसेना संघर्ष
९ अ मध्ये शिंदे शिवसेनेचा अत्यंत कमी फरकाने विजय झाला, जो भाजपसाठी संधी हुकल्यासारखा ठरला.
९ ब मध्ये मात्र भाजपच्या अन्वेषा आचरेकर यांनी शिंदे शिवसेनेला पराभूत करत भाजपची ताकद दाखवून दिली.
प्रभाग ९ अ मधून शिंदे शिवसेनेच्या महेश अशोक कोयंडे यांनी भाजपच्या सन्मेष सुरेश परब यांचा ३० मतांनी पराभव केला. महेश कोयंडे यांना ५३० मते मिळाली तर परब यांना ५०० मते मिळाली. ठाकरे शिवसेनेचे निलेश सुधाकर दुदवडकर यांना २५० मते मिळाली. प्रभाग ९ ब मधून भाजपच्या सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांनी प्रतिस्पर्धी शिंदे शिवसेनेच्या उमेदवार सौ. प्रमिला प्रदीप मोर्जे यांचा ७३ मतांनी पराभव केला. आचरेकर यांना ५२७ मते तर मोर्जे ४५४ मते मिळाली. ठाकरे शिवसेनेच्या माधुरी अन्वय प्रभू यांना २९० मते मिळाली.
प्रभाग १० : ठाकरे गटाची पुनरुज्जीवनाची चाहूल
१० अ मध्ये ठाकरे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय मिळवत आपली पारंपरिक मतपेढी शाबूत असल्याचे दाखवले.
१० ब मध्ये मात्र शिंदे शिवसेनेने ठाकरे गटाला निसटता पण महत्त्वपूर्ण धक्का दिला
प्रभाग १० अ मधून ठाकरे शिवसेनेचे तपस्वी तुळशीदास मयेकर यांनी अपेक्षेप्रमाणे विजय संपादन केला. मयेकर यांनी शिंदे शिवसेनेच्या सीताराम बाबाजी लुडबे यांचा १८२ मतांनी पराभव केला. मयेकर यांना ६२४ मते तर लुडबे यांना ४४२ मते मिळाली. भाजपच्या रमेश हडकर यांना १६५ मतांवर समाधान मानावे लागले. प्रभाग १० ब मधून माजी नगरसेविका सेजल सन्मेष परब यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या प्रभागात शिंदे शिवसेनेच्या भाग्यश्री सुरेश मयेकर यांच्या गळ्यात विजयश्रीने माळ घातली. भाग्यश्री मयेकर यांना ४६६ मते तर प्रतिस्पर्धी ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार राधिका सुनील मोंडकर यांना ४३३ मते मिळाली. सौ. मयेकर या ३३ मतांनी विजयी झाल्या. भाजपच्या सेजल परब यांना ३२४ मते मिळाली.
एकूणच, मालवण नगरपालिका निवडणूक ही शिंदे शिवसेनेसाठी मोठा राजकीय विजय ठरली आहे. नगराध्यक्ष पदासह दहा नगरसेवकांच्या बळावर त्यांनी पालिकेवर निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली. भाजपसाठी ही निवडणूक आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारी, तर उबाठा शिवसेनेसाठी संघटन पुन्हा उभारण्याचा इशारा देणारी ठरली आहे.
आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केलेला “पारदर्शक कारभार” हा शब्द आता अपेक्षांच्या कसोटीवर उतरणार आहे. मालवणच्या मतदारांनी दिलेला स्पष्ट कौल हा विकासासाठी आहे की राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी, याचा खरा निकाल येणाऱ्या काळातील पालिकेच्या कामकाजातूनच समोर येईल





