मालवण, दि. प्रतिनिधी : मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी शनिवार, २१ डिसेंबर रोजी पार पडणार असून, निवडणूक प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्ण तयारीनिशी सज्ज झाली आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक थोरात व पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली.

🔹 मतमोजणीचा कार्यक्रम
सकाळी ९.३० वाजता उमेदवार व प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉंगरूम उघडणार
१० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात
मतमोजणीस येणाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक
🔹 प्रभागनिहाय दोन फेऱ्यांत मतमोजणी
प्रथम प्रभाग १ ते ५ यांची दोन फेऱ्यांत मतमोजणी
पहिल्या दोन फेऱ्यांत नगराध्यक्ष पदाचे मत जाहीर
त्यानंतर प्रभाग ६ ते १० यांची मतमोजणी
प्रत्येक टेबलवर नगरसेवक उमेदवाराचा एक प्रतिनिधी
नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येक टेबलवर पाच प्रतिनिधी
संपूर्ण प्रक्रियेसाठी २५ कर्मचारी नियुक्त
मतमोजणी प्रभागनिहाय होणार असून, प्रथम प्रभाग क्रमांक १ ते ५ यांची दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाईल. प्रत्येक टेबलवर पहिल्या फेरीत संबंधित मतदान केंद्राचे पहिले मतदान यंत्र, तर दुसऱ्या फेरीत दुसरे मतदान यंत्र मोजले जाणार आहे. दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर या पाच प्रभागांतील विजयी उमेदवार जाहीर केले जातील. याच टप्प्यात नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांचे मतदान निकालही जाहीर करण्यात येणार आहेत. यानंतर प्रभाग क्रमांक ६ ते १० यांचीही दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होऊन नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार घोषित केले जातील
राजकीय पक्षांसाठी स्वतंत्र थांबे, वाहतूक बदल
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर फोवकांडा पिंपळ भागात भाजप, नाट्यगृह लगतच्या भागात शिंदे शिवसेना, तर बांगीवाडा भागात ठाकरे शिवसेना यांच्यासाठी थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
भरड नाका ते फोवकांडा पिंपळ तसेच बांगीवाडा ते हॉटेल कोणार्क हा मार्ग दुपारी १ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
मतमोजणी केंद्रावर ६ पोलीस अधिकारी, २० अंमलदार, १४ गृहरक्षक दलाचे जवान, तर मतदान केंद्राच्या बाहेर ३ अधिकारी, १७ अंमलदार, १७ गृहरक्षक दलाचे जवान तैनात राहणार आहेत. गस्तीसाठी ४ अधिकारी व ४ अंमलदार, तपास पथकासाठी १ अधिकारी व ४ अंमलदार, तसेच स्ट्रॉंगरूम व इतर ठिकाणी १ अधिकारी, १४ अंमलदार व ८ गृहरक्षक दलाचे जवान नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय शहरात विशेष कृतीदलाचे १५ जवान, दंगा काबू पथकाचे ३० जवान आणि राज्य राखीव पोलीस दलाचे ३० जवान बंदोबस्तासाठी तैनात असतील.
पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
रस्ते बंद असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी केले आहे.
हडी–कोळंब मार्गे येणाऱ्या वाहनांनी कोळंब नाका सागरी महामार्ग – देऊळवाडा नाका मार्गे प्रवास करावा. बाजारपेठ व बांगीवाडा येथे जाणाऱ्या वाहनांसाठी भरड नाका – लीलाधर हडकर मार्ग – बांगीवाडा, तर मालवण बाजारपेठ व जेटी मार्गे येणाऱ्या वाहनांनी राजकोट रस्ता, कचेरी रोड, माघी गणेश मंदिर मार्ग वापरावा, असे त्यांनी स्पष्ट केले.






