कट्टा (प्रतिनिधी) :
शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त), वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल तसेच डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता उत्साहात संपन्न होणार आहे.
या स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या सहभागातून सादर होणारे भव्य पौराणिक नाट्यप्रयोग ‘दशावतार’. देवांचा देव भगवान विष्णू यांच्या दहा प्रमुख अवतारांचे दर्शन रंगमंचावर साकारण्याचा प्रयत्न विद्यार्थी करणार असून, या नाट्यप्रयोगात नृत्य, नाट्य आणि संगीत यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार आहे.
या पौराणिक महानाट्यात सुमारे ५०० विद्यार्थी सहभागी होत असून, भव्य रंगमंच, आकर्षक प्रकाशयोजना, ट्रिक सीन आणि अत्याधुनिक एलईडी स्क्रीनच्या साहाय्याने ‘दशावतार’ सादर केला जाणार आहे. सांस्कृतिक परंपरा, अध्यात्मिक मूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
या वार्षिक स्नेहसंमेलनास पंचक्रोशीतील नागरिक, पालक, माजी विद्यार्थी व सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






