दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर नुकत्याच पार पडलेल्या युनेस्को परिषदेअंतर्गत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राच्या नऊ महिला कलाकारांनी सादर केलेल्या पारंपरिक लेझीम नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी आयोजित आंतरसरकारी समितीच्या २० व्या अधिवेशनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या भव्य कार्यक्रमाला युनेस्कोच्या १७५ देशांतील सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा, शिस्तबद्ध हालचाली आणि तालबद्ध लेझीमच्या ठेक्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची लोककला प्रभावीपणे सादर झाली. भारताच्या सांस्कृतिक वैभवाविषयी जाणून घेण्याचे परदेशी प्रतिनिधींचे कुतूहल आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय पर्यटन मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत तसेच कार्यक्रमाचे समन्वयक श्री. महेंद्र कुमार सिंग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. लेझीम सादरीकरणानंतर कलाकारांचे विशेष कौतुक करताना मंत्री शेखावत यांनी, “भारतीय लोककला जतन करण्याचे कार्य अत्यंत उत्तम प्रकारे झाले आहे,” असे गौरवोद्गार काढले. तसेच भविष्यात २६ जानेवारी रोजी राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी संकेत दिले.
देशातच नव्हे तर परदेशातही महाराष्ट्राची लोककला पोहोचविण्यात मोलाचा वाटा उचलणारे शिवकालीन तुतारी लोककला मंडळ, कांदिवली पश्चिम (मुंबई) यांचे संस्थापक अध्यक्ष श्री. पांडुरंग शंकर गुरव यांच्या पुढाकारामुळेच या लेझीम पथकाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली कला सादर करण्याची सुवर्णसंधी मिळाली.
लाल किल्ल्यावर सादर झालेल्या या लेझीम नृत्याने केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण भारताची लोकसांस्कृतिक ओळख जागतिक स्तरावर अधिक ठळकपणे अधोरेखित केली आहे.





