गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने चुनवरे महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २५, २६ व २७ डिसेंबर असे सलग तीन दिवस चालणार असून, या कालावधीत सांस्कृतिक, मनोरंजनात्मक व स्पर्धात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, गुरुवार २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता पोईप बाजारपेठ ते चुनवरे मळा दरम्यान भव्य चित्ररथ यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत ढोल-ताशा, चित्ररथ व दिंडीचा सहभाग राहणार असून परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे.
रात्री ८ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, त्यानंतर रात्री ९ वाजता “ऑल दि बेस्ट” हे भन्नाट विनोदी नाटक सादर केले जाणार आहे.
शुक्रवार २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता प्रत्येक वाडीमध्ये ‘स्मार्ट सुनबाई’ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता साई कलामंच निर्मित व साईनाथ एंटरटेन्मेंट प्रकाशित “रंगी रंगला महाराष्ट्र” हा सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, शनिवार २७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता ‘स्मार्ट सुनबाई’ महाअंतिम सोहळा पार पडणार असून, या वेळी नागेश नेमळेकर भाऊजी प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. त्यानंतर रात्री १० वाजता श्री. कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांच्या वतीने पौराणिक व ट्रिकसिनयुक्त दशावतारी नाटक “जोगुलांबा अर्थात कालसर्प भैरवी” सादर केले जाणार आहे.
या तीन दिवसीय चुनवरे महोत्सवाला परिसरातील नागरिकांनी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.






