२०१४ पासून सातत्याने होत असलेल्या पराभवामुळे राजन तेली यांचे मानसिक संतुलन बिघडले असून राजकीय रागापोटी ते सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नाहक आरोप करत आहेत, असा आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केला. जिल्हा बँक दरोडेखोरांपासून वाचवावी, असे विधान करणारे राजन तेली हे स्वतः प्रशिक्षित दरोडेखोर असल्याचा घणाघात दळवी यांनी पत्रकार परिषदेत केला. आमदार निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटमधून तेली बोध घेणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दळवी म्हणाले की, राजन तेली यांनी बँकेचा अधिकृत लोगो वापरून पत्रकार परिषद घेतली तसेच कर्जदाराचा तपशील जाहीर करून नियमभंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. वैयक्तिक राग काढण्यासाठी बँकेवर आरोप करण्यात येत असून बँकेकडून कर्जपुरवठा हा आयकर विवरणपत्राच्या आधारेच केला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.
तेली यांच्या मुलांच्या नावाने कर्ज मंजूर करताना तेली यांचीही आवश्यक पात्रता नव्हती. जून २०२१ मध्ये त्यांनी जिल्हा बँकेकडून १५ टक्के व्याजदराने ९ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जावर दोन वर्षे केवळ व्याज आणि त्यानंतर हप्त्यासह व्याज भरणे अपेक्षित होते. मात्र कर्ज थकीत झाल्यानंतर तारण असलेले व्यापारी गाळे विकून कर्जफेड करण्याची परवानगी मागण्यात आली. त्यानुसार गाळे विक्रीची मुभा देण्यात आली. त्यानंतर व्याजदरात सवलत देत बँकेने तेली यांना ४३ लाख रुपयांची सवलत दिली.
तथापि, गाळे विकून मिळालेली रक्कमही कर्जफेडीसाठी भरली गेली नाही. परिणामी २१ डिसेंबर २०२३ रोजी तेली यांचे कर्जखाते थकबाकीत गेले. वारंवार पाठपुरावा करूनही थकबाकी भरली न गेल्याने बँकेचा एनपीए रेशो ९६ टक्क्यांपर्यंत गेला. त्यामुळे कर्जवसुलीसाठी बँकेला कायदेशीर कारवाई करावी लागली, असे दळवी यांनी सांगितले.
कर्जाच्या रकमेचा गैरवापर झाल्याचा आरोप करत सहकार न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने बँकेच्या बाजूने निर्णय देत राजन तेली यांच्या सिंधुदुर्ग आणि रायगड येथील मालमत्तांवर अटॅचमेंटचे आदेश दिले. पुढे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने तेली यांचे पुत्र प्रथमेश आणि सर्वेश यांना संपूर्ण कर्जफेड करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुदतवाढ घेऊन तेली यांनी १५ कोटी २९ लाख ६० हजार रुपये व्याजासह संपूर्ण कर्जफेड केली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक मागील १७ वर्षांपासून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेने कार्यरत असल्याचे दळवी यांनी सांगितले. बँकेच्या कारभारावर खासदार राणे यांचे बारीक लक्ष असते आणि गैरप्रकार होऊ नयेत याची दक्षता घेतली जाते. जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना उद्योजक म्हणून घडविण्यावर भर देत एमएसएमई व इतर योजनांशी जिल्हा बँकेला जोडण्यात आले असून, कर्जपुरवठ्यातून होणारा नफा ठेवीदार व खातेदारांना लाभदायी ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.





