मालवण | प्रतिनिधी
श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदाय, मालवण यांच्या वतीने श्री क्षेत्र दत्तमंदिर, वायरीबांध (मालवण) येथे परमपूज्य श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज ध्यानमंदिर वर्धापन दिन सोहळा तसेच कुमारिका पूजन सोहळा गुरुवार दि. १८ डिसेंबर व मंगळवार दि. २३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. हे दोन्ही धार्मिक कार्यक्रम संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष श्री विलास (बापूजी) झाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहेत.
वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त गुरुवार दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता परमपूज्य श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता मध्याह्न आरती व दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७.३० वाजता संप्रदायिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच मंगळवार दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घटस्थापना व कुमारिका पूजन सोहळा पार पडणार आहे. दुपारी १ वाजता महाप्रसाद तर सायंकाळी ७.३० वाजता संप्रदायिक भजन आयोजित करण्यात आले आहे.
या दोन्ही दिवशी होणाऱ्या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन माऊली परिवाराचे कार्याध्यक्ष श्री. कृष्णा वसंत बांदेकर यांनी केले आहे.






