मुंबई | प्रतिनिधी :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज महत्त्वपूर्ण घडामोड घडण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
या पत्रकार परिषदेत आगामी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांच्या कार्यक्रमाबाबत महत्त्वाच्या घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे राज्यातील राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार तसेच मतदारांचे लक्ष लागले असून, आजच्या पत्रकार परिषदेतून निवडणुकांच्या तारखा, आरक्षण प्रक्रिया किंवा तयारीबाबत स्पष्टता मिळण्याची अपेक्षा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकशाही व्यवस्थेचा कणा मानल्या जात असल्याने, या संदर्भातील निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. आजच्या पत्रकार परिषदेनंतर राज्याच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.






