मुंबई : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची आणि बहुप्रतीक्षित रेल्वे सेवा अखेर सुरू होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यानची नवीन दैनिक एक्सप्रेस ट्रेन गुरुवार, ३ सप्टेंबरपासून नियमित धावणार आहे. या रेल्वे सेवेला गुरुवारी दुपारी १२.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या या नव्या रेल्वेमुळे मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के तसेच कोकणातील इतर खासदारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर या दैनिक एक्सप्रेस सेवेला मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे मुंबईहून थेट सावंतवाडीपर्यंत नियमित रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.
या नव्या रेल्वेचे ठाण्यात खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि कोकणवासीयांकडून जंगी स्वागत करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
खासदार नरेश म्हस्के यांनी कोकणातील जनतेला नवीन ट्रेन सुरू करण्याचा शब्द दिला होता. “उद्यापासून ट्रेन सुरू होत असून ही आपली वचनपूर्ती आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या रेल्वे सेवेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे कोकणवासीयांच्या वतीने त्यांनी आभार मानले.
५१० किलोमीटरचा थेट रेल्वे संपर्क
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोडदरम्यानची ही सेवा सुमारे ५१० किलोमीटरच्या मार्गावर धावणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणातील प्रमुख शहरांदरम्यान थेट रेल्वे संपर्क अधिक सक्षम होणार आहे. पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यवसाय तसेच सामाजिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा फायदा होणार आहे.
या स्थानकांवर थांबे
नवीन दैनिक एक्सप्रेसला पुढील स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत—
दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, वालिवाडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
प्रस्तावित गाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि १५०८८ सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या नावाने ही सेवा दररोज धावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नव्या रेल्वेमुळे कोकणातील पर्यटनाला देखील चालना मिळण्याची अपेक्षा आहे. समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे आणि निसर्ग पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि नियमित प्रवाशांसाठीही ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरू होणाऱ्या या दैनिक एक्सप्रेसमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार असून, मुंबई-कोकण प्रवासी वाहतुकीवरील वाढता ताण कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.






