● वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्ग कामाला गती
● मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील आढावा बैठकीत कोकण विकासाला मोठी चालना
● खासदार नारायण राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित
● सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणात रोजगार, पर्यटन, उद्योगवृद्धीच्या नव्या संधी
कोकणवासीयांच्या दशकांपासूनच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देणारा ऐतिहासिक निर्णय अखेर गुरुवारी जाहीर झाला आहे. बहुप्रतिक्षित वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्ग महाराष्ट्र शासन उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे ही माहिती देत कोकण विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे सांगितले.
या प्रकल्पासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याच प्रयत्नांचे आज फलित मिळाले असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
कोकणासाठी गेमचेंजर ठरणारा निर्णय – नितेश राणे
नागपूर विधान भवनात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे म्हणाले :
“मुख्यमंत्र्यांनी वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्ग राज्य शासनामार्फत उभारण्याचे आणि तातडीने भूसंपादन सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय केवळ कोकणासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणार आहे.”
या मार्गामुळे :
- कृषी, मत्स्य उत्पादनांच्या वाहतुकीला मोठी चालना
- पर्यटनाला विक्रमी वाढ
- पूर व भूस्खलन काळात पर्यायी दळणवळणाचा मार्ग उपलब्ध
- उद्योगवृद्धी आणि गुंतवणुकीसाठी कोकण अधिक आकर्षक
अशा अनेक लाभांची अपेक्षा आहे.
खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश
मंत्री नितेश राणे म्हणाले :
- “या प्रकल्पासाठी खासदार नारायण राणे यांनी राज्य आणि केंद्र सरकारपुढे सातत्याने पाठपुरावा केला. आमदार निलेश राणे यांनीही यात मेहनत घेतली.”
- “या एका निर्णयामुळे सिंधुदुर्गात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. मनिऑर्डर संस्कृती कायमची इतिहासजमा होईल. तरुणांना गावातच रोजगाराची संधी मिळेल.”
- “मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे मी बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनःपूर्वक स्वागत करतो.”
प्रकल्प टाईमबाऊंड पद्धतीने पूर्ण करणार
मंत्री राणे यांनी पुढे सांगितले :
- “हा रेल्वेमार्ग टाईमबाऊंड पद्धतीने पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.”
- कोकणातील आंबा, काजू, मत्स्य उत्पादने, दुग्धजन्य पदार्थांची निर्यात-साखळी मजबूत होणार
- जयगड व रेडी बंदराशी कनेक्टिव्हिटी मिळाल्याने विकासाची नवी दालने उघडणार
- सिंधुदुर्गचा दरडोई उत्पन्न २.५ लाखांवरून ४.५ ते ५ लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न
“आजचा दिवस कोकणच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल,” अशी भावना राणे यांनी व्यक्त केली.







