मालवण, दि. ७ (प्रतिनिधी) : कुडोपी गाव व परिसरात सुरू असलेल्या लाल दगडाच्या उत्खननामुळे नैसर्गिक झरे, विहिरी आणि अन्य जलस्रोत बाधित होत असल्याचा आरोप करत चिरेखाण बंद करण्याच्या मागणीसाठी कुडोपी ग्रामस्थांनी सोमवारी मालवण तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. दिवसभर आंदोलन केल्यानंतर सायंकाळी तहसीलदार गणेश लव्हे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाकडून कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.
कुडोपी ग्रामस्थ सकाळी दहा वाजल्यापासून तहसील कार्यालयासमोर ठाण मांडून होते. सरपंच संतोष पाणवलकर, सदस्य प्रशांत पडवळ, सदस्य गुरुप्रसाद मयेकर यांच्यासह बाळकृष्ण पडवळ, हेमंत पडवळ, दिव्या पडवळ, समीर हिर्लेकर, भास्कर पडवळ, अक्षय घाडी, दिनेश वाळवे, दत्ताराम वाळवे, राजेंद्र वाळवे, शशिकांत वाळवे, गणेश वाळवे, गुरुदास घाडी आदी ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.
जलस्रोत दूषित होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ग्रामस्थांनी तहसीलदार लव्हे यांच्याकडे मांडलेल्या भूमिकेनुसार, कुडोपी परिसरात मोठ्या प्रमाणात लाल दगडाचे उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे परिसरातील नैसर्गिक झरे, विहिरी आणि अन्य जलस्रोतांवर विपरीत परिणाम होत असून पर्यावरणाचेही नुकसान होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
गावाला पाणीपुरवठा करणारे नैसर्गिक झरे आणि जलस्रोत हे ग्रामस्थांसाठी जीवनदायी असून, खाणीतून मातीमिश्रित पाणी वाहून जलस्रोतांमध्ये मिसळत असल्याने पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचाही दावा त्यांनी केला.
खाणीवर काम करणारे कामगार उघड्यावर शौचास बसत असल्याने पावसाळ्यात ही घाण वाहून जलस्रोतांमध्ये मिसळण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चिरेखाणीमुळे गावातील पुरातन कातळशिल्पांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
अहवालांनंतर खाण बंद करण्याबाबत निर्णय
या पार्श्वभूमीवर सदर चिरेखाण बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तहसीलदार गणेश लव्हे यांनी ग्रामस्थांना लेखी पत्र देऊन प्रशासनाच्या कार्यवाहीबाबत आश्वस्त केले.
सदर चिरेखाण परिसराची स्थळपाहणी करण्यात आली असून, उत्खननाच्या ठिकाणी आवश्यक प्रतिबंधात्मक व सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण होणार नाही तसेच सार्वजनिक गैरसोय निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, खाण परवान्यातील अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना खाणमालकाला देण्यात आल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले.
सदर खाणीच्या परवान्याबाबत प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून, खाणीतून येणाऱ्या पाण्यामुळे तसेच उघड्यावर शौचामुळे जलस्रोत दूषित होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांचे अहवाल घेण्यात येणार आहेत. तसेच खाणमालकाचे म्हणणेही दाखल करून घेतल्यानंतर खाण कायमस्वरूपी बंद करण्याबाबत निर्णय घेता येईल, असे आश्वासन तहसीलदार लव्हे यांनी दिले.
प्रशासनाकडून मिळालेल्या या आश्वासनानंतर कुडोपी ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले.






