जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून स्वागत; विविध विभागांच्या खातेप्रमुखांनीही केले अभिनंदन
सिंधुदुर्ग, दि. ७ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांनी प्रशासकीय कामकाजाची सूत्रे हाती घेतली.
पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख तृप्ती धोडमिसे यांनी डॉ. अपूर्वा बासूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे खातेप्रमुख तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. अपूर्वा बासूर या २०२२ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी वाशिम येथे अतिरिक्त सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तसेच पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे उपविभागीय अधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्याचा अनुभव असलेल्या डॉ. बासूर यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






