मालवण : प्रतिनिधी
आचरा येथील त्रिनेत्र मित्र मंडळ संचलित मसल क्रिएशन फिटनेस आणि कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत यजमान मसल क्रिएशन फिटनेस, आचरा संघाने ४७ गुण मिळवत ‘बेस्ट जिम ऑफ सिंधुदुर्ग’ हा किताब पटकावला. जामसंडे येथील गणेश वायंगणकर यांनी ‘स्ट्राँग मॅन ऑफ सिंधुदुर्ग’, तर आरती आंबेडकर यांनी ‘स्ट्राँग वूमन ऑफ सिंधुदुर्ग’ हा सन्मान मिळविला.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १२८ खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये अशेष पेडणेकर, महादेव बागडे, एकनाथ साटम, प्रफुल्ल नलावडे, आशा हजारे, प्रज्ञा पेडणेकर, सांस्कृति पेडणेकर, निनाद पेडणेकर, गीतांजली चव्हाण, स्नेहल चव्हाण, सोनिका सैनी, मनीष चव्हाण, आदित्य पाडावे, मधुरा कावले, दीपेश चिंदरकर आणि चेतना चव्हाण यांनी सुवर्णपदक पटकावले.
प्रणित धुमडे, तनिष्क पेडणेकर आणि नितीन गावकर यांनी रौप्यपदक मिळविले. तरुण सैनी, हरिदास महाले आणि प्रज्वल आचरेकर यांनी कांस्यपदक पटकावले. अवधूत गावकर, राज माने आणि संस्कार तिरोडकर यांनीही स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाला त्रिनेत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश सरजोशी, कोकण सिंधूचे संचालक संजय साटमसर, प्रमुख पाहुणे उद्योजक शाकिफ सोलकर, पोलीस उपनिरीक्षक संजय कातिवले, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबरी, उद्योजक रोहन कोदे, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर आदी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मसल क्रिएशन फिटनेसच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.







