मालवण : प्रतिनिधी
मालवण शहर व तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विविध मंदिरे, शाळा-महाविद्यालये तसेच घराघरांत श्रीकृष्ण मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात श्रीकृष्ण नामाचा जयघोष, आरती आणि सुस्वर भजनांनी वातावरण भक्तिमय झाले होते.
शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध मंदिरांमध्ये दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. ठिकठिकाणी भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने जन्माष्टमीचा उत्साह अधिकच वाढला.
शाळा-महाविद्यालयांमध्येही जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण-राधेच्या वेशभूषा करून कार्यक्रमात सहभाग घेतला. मुलींनी पारंपरिक फुगड्या खेळत उत्सवात रंगत आणली. याशिवाय श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.
मालवण शहरातील टोपिवाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, भंडारी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, तसेच वायरी येथील रेकोबा हायस्कूल यांसह विविध शाळांमध्ये गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे शाळांच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
श्रीकृष्णाच्या भक्तिगीतांनी, भजनांनी आणि नामघोषाने अवघी मालवण नगरी दुमदुमून गेली होती. भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक उत्साहाचा सुंदर संगम घडवत मालवणकरांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली.







