मालवण (प्रतिनिधी)
मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील समुद्रात मासेमारी करताना लाटांच्या तडाख्यात मच्छिमारी नौका पलटी होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत दांडी येथील नौका मालक तथा मच्छिमार नेते सन्मेष सुरेश परब आणि मच्छिमार अक्षय हनुमंत राणे यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर सन्मेष परब यांचा मुलगा सुयोग सन्मेष परब याला स्थानिक मच्छिमारांनी समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. मच्छिमारी हंगामाच्या प्रारंभीच मालवणच्या समुद्रात घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण किनारपट्टीवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दांडी येथील मच्छिमार सन्मेष सुरेश परब यांनी सोमवारी सायंकाळी समुद्रात मासेमारीसाठी जाळी टाकून ठेवली होती. मंगळवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मालकीच्या नौकेतून मुलगा सुयोग परब आणि खलाशी अक्षय राणे यांच्यासोबत दांडीसमोरील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील समुद्रात जाळी काढण्यासाठी गेले होते.
किल्ल्याच्या मागील खडकाळ भागात समुद्राला जोरदार लाटा होत्या. जाळी काढण्याचे काम सुरू असतानाच अचानक आलेल्या मोठ्या लाटेने नौकेला जोरदार तडाखा दिला आणि नौका समुद्रात पलटी झाली. त्यावेळी नौकेतील तिघेही समुद्रात फेकले गेले. तिघेही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सन्मेष परब आणि अक्षय राणे समुद्रात बेपत्ता झाले.
दरम्यान, सुयोग परब याने नौकेतील डब्यांचा आधार घेतल्याने तो पाण्यावर तरंगत राहिला. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छिमारांनी तातडीने समुद्रात धाव घेतली. जयदेव लोणे यांच्या नौकेच्या मदतीने सुयोग परब याला समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
दुर्घटनेनंतर काही वेळाने सन्मेष परब आणि अक्षय राणे यांचे मृतदेह मच्छिमारांना समुद्रात आढळून आले. दोन्ही मृतदेह किनाऱ्यावर आणल्यानंतर शवविच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच दांडीसह मालवणच्या संपूर्ण किनारपट्टीवरील मच्छिमारांनी दांडी किनाऱ्यावर मोठी गर्दी केली. सन्मेष परब हे पारंपरिक मच्छिमारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे कार्यकर्ते म्हणून परिचित होते. पारंपरिक मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलने आणि उपोषणांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
राजकीय क्षेत्रातही सन्मेष परब सक्रिय होते. पूर्वी उबाठा शिवसेनेत कार्यरत असलेले परब अलीकडे भाजपमध्ये सक्रिय झाले होते. ते भाजपच्या मालवण शहर मंडल उपाध्यक्षपदावर कार्यरत होते. मालवणच्या माजी नगरसेविका सेजल परब यांचे ते पती होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने दांडीसह मालवणच्या सामाजिक, राजकीय आणि मच्छिमार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.







