कुडाळ – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची रणनीती आखण्यासाठी कुडाळ तालुक्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत “जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा फडकविण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करा,” असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना केले.
बैठकीत कुडाळ तालुक्यातील संभाव्य उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या तालुकाप्रमुख कृष्णा धुरी आणि तालुका संघटक सचिन कदम यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्ताधाऱ्यांवर वैभव नाईक यांचा जोरदार प्रहार
आपल्या भाषणात वैभव नाईक यांनी सत्ताधारी आमदार-खासदारांवर तीव्र टीका केली.
त्यांनी म्हटले की—
गेल्या वर्षभरात कुडाळ तालुक्याचा विकास पूर्णपणे ठप्प आहे.
महायुती सरकारकडून शाळा-हायस्कूल बंद करण्याची धोरणे लोकविरोधी आहेत.
जलजीवन मिशनमधील नवीन नळयोजनेची एकही कामे पूर्ण न झाल्याचे त्यांनी सांगितले.
कुडाळमधील रस्त्यांची दुरवस्था, ढासळलेली आरोग्यव्यवस्था आणि मेडिकल कॉलेजमधील अपुर्या सुविधांचा त्यांनी उल्लेख केला.
नागरिकांना उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे जावे लागणे ही सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाची पावती असल्याचे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, “नागरिकांचा रोष वाढत आहे. जनतेचे प्रश्न सोडवू शकणारा पक्ष म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे). त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवावा आणि निवडणुकीसाठी आतापासूनच सज्ज व्हावे.”
बैठकीस उपस्थित मान्यवर
या बैठकीला उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकासंपर्क प्रमुख अतुल बंगे, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगांवकर, अवधूत मालणकर, विभागप्रमुख दिपक आंगणे, मंगेश बांदेकर, बाळा कांदळकर, गंगाराम सडवेलकर, दत्ताराम उभारे, शैलेश विरनोडकर, राजेंद्र घाडीगावकर, नरेंद्र राणे, दशरथ मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत निवडणूक तयारी, जनसंपर्क मोहीम आणि संघटन बांधणी याबाबत सविस्तर चर्चा झाली. कुडाळ तालुक्यात पक्ष मजबुतीसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.







