सिंधुदुर्ग – राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्यानंतर शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १८,३७१ शेतकऱ्यांना ४ कोटी ८६ लाख ९ हजार रुपये इतके अनुदान तातडीने मंजूर करण्यात आले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय अधिकृतरीत्या निर्गमित झाला असून, ही रक्कम अत्यंत लवकर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भात, भाजीपाला, फळबागा आणि इतर हंगामी पिकांचे व्यापक नुकसान झाले होते. प्रशासकीय पातळीवर पंचनामे आणि तपासणी पूर्ण केल्यानंतर शासनास अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार केंद्र व राज्य सरकरांनी उपलब्ध तरतुदीनुसार हा मदतअनुदान मंजूर करण्यात आले आहे
शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार असून, अवकाळी पावसामुळे कोलमडलेल्या शेती अर्थचक्राला काही प्रमाणात दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







