९ आणि ११ सप्टेंबरला दादरहून कोकणाकडे विशेष रेल्वे; नितेश राणेंची घोषणा
मुंबई, दि. ३१ (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून यंदाही ‘मोदी एक्स्प्रेस’ सज्ज झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ९ आणि ११ सप्टेंबर रोजी ही विशेष रेल्वे दादरहून कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे.
गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांसाठी ‘मोदी एक्स्प्रेस’ची सेवा उपलब्ध करून देण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. यंदाही या विशेष रेल्वेची तयारी पूर्ण झाली असून, ९ आणि ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून ‘मोदी एक्स्प्रेस’ कोकणाकडे रवाना होणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने मुंबई आणि उपनगरांतून कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना या विशेष रेल्वेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. गर्दीच्या काळात सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, ‘मोदी एक्स्प्रेस’च्या तिकीट बुकिंगसाठी २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत नोंदणी करता येणार आहे. इच्छुक गणेशभक्त चाकरमान्यांनी तिकीट बुकिंगसाठी संबंधित भाजप मंडल अध्यक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीयांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाची १४ वर्षांची परंपरा यंदाही कायम राहणार असल्याने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्त चाकरमान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.







