मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील विविध विकासकामांसाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीअंतर्गत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील रस्ते, गटारे, आर.सी.सी. लाद्या, काँक्रीटीकरण तसेच बंदर परिसरातील शोभिवंत सोलर दिव्यांसह एकूण १४ विकासकामे मार्गी लागणार आहेत. यापुढील टप्प्यातही शहरासाठी आणखी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल, अशी माहिती मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी दिली.
मालवण शहराच्या विकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे बापर्डेकर यांनी आभार मानले. विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत असताना विरोधकांनी केवळ विकासनिधीचे आकडे मोजत राहावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
मंजूर निधीतून आडारी मेन रोड ते शिरोडकर घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, वायरी मेन रोड ते भर्डेवाडा अन्सुलकर घरापर्यंत रस्ता डांबरीकरण, वायरी मेन रोड ते हिंदळेकर घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण, तसेच वायरी मारुती मंदिर ते श्रीकांत वेंगुर्लेकर घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे.
याशिवाय झांट्ये काजू फॅक्टरीसमोरील औदुंबर रस्ता ते दर्यासारंग हॉटेलपर्यंत गटार बांधणे व आर.सी.सी. ओतीव लाद्या बसविणे, समर्थ आंगण कॉर्नर ते साई मंदिर आर.सी.सी. गटार उभारणे, आडारी मेन रोड ते बाळा फाटक घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, तसेच रांगोळी महाराज समोरील वसंत विहार इमारत ते पाटकर घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचा समावेश आहे.
भरड रिक्षा स्टॅण्ड ते निर्मिती नर्सरी या मार्गावरील दुतर्फा गटारांवर आर.सी.सी. लाद्या बसविणे, मंत्री घरासमोर ते साळगावकर घरापर्यंत आर.सी.सी. गटार बांधणे, मालवण बंदरातील नवीन व जुनी जेटी परिसरात शोभिवंत सोलर लाईट बसविणे, कोदेघर रस्त्याचे डांबरीकरण, दुधवडकर घर ते रिक्षा नाका-दांडी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कव्हिंग बांधणे आणि तानाजी नाका ते शेर्लेकर घरापर्यंत दुतर्फा आर.सी.सी. गटार बांधण्याची कामेही केली जाणार आहेत.
या विकासकामांमुळे शहरातील रस्ते आणि मूलभूत सुविधांना चालना मिळून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. “मालवण शहराच्या विकासाचा वेग यापुढेही कायम राहील. आगामी टप्प्यात आणखी विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील,” असे सहदेव बापर्डेकर यांनी स्पष्ट केले.







