मुंबई, दि. २९ : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक आणि धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी राज्य शासनाच्या विविध यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. सर्व नागरिकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रवास सुविधा आणि मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
नेपाळमधील परिस्थितीवर महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार मदतकार्य आणि समन्वयाची प्रक्रिया सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार, राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित असून ३३८ नागरिकांशी संपर्क झाला आहे.
सागा येथून ४१ नागरिक आज महाराष्ट्राच्या दिशेने परतले आहेत. तर १०६ नागरिकांचा प्रवास नागपूरच्या दिशेने सुरू झाला असून ते उद्या पहाटे ४.३० वाजता नागपूरला पोहोचण्याची शक्यता आहे. याशिवाय सुमारे १४३ नागरिक सुरक्षितपणे महाराष्ट्रात परतण्याच्या मार्गावर आहेत.
४५ पर्यटकांनी भारतीय हद्दीत प्रवेश
महाराष्ट्रातील ४५ पर्यटकांच्या एका ग्रुपने आज भारतीय हद्दीत सुरक्षित प्रवेश केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक, पुणे, मुंबई आणि अहिल्यानगर येथील नागरिक नेपाळला गेले होते. महापुराच्या काळात हे पर्यटक चितवन येथे होते.
काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्याने या पर्यटकांना लुंबिनीमार्गे भारतात आणण्यात आले. त्यानंतर ते अयोध्येला पोहोचले असून, शासनाच्या सूचनेनुसार त्यांच्या पुढील प्रवासाचे नियोजन करण्यात येणार आहे.
चीनमधून नेपाळमध्ये पोहोचलेले १४९ भारतीय
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने २८ ऑगस्टअखेर चीनमधून नेपाळमध्ये सुरक्षित प्रवेश केलेल्या १४९ भारतीय पर्यटकांची यादी राज्यांना पाठवली आहे. या यादीतील महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती आणि नावे संबंधित जिल्ह्यांकडून पडताळून एकत्रित केली जात आहेत. हे पर्यटक लवकरच भारतात परतण्याची शक्यता आहे.
या यादीमध्ये मुंबई शहर किंवा मुंबई उपनगरातील कोणत्याही नागरिकाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला आतापर्यंत कोणताही कॉल प्राप्त झालेला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बोरीवली-अंधेरीतील ८ पर्यटकांशी संपर्काचा प्रयत्न
दरम्यान, बोरीवली आणि अंधेरी येथील ८ पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. अंधेरीतील लक्ष्मीनारायण आचार्य यांच्यासह त्यांच्या ग्रुपमधील काही जणांशी सध्या मोबाईलवरून संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. संबंधित पर्यटकांच्या नातेवाईकांच्या संपर्कातही प्रशासन आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर अडकलेल्या पर्यटकांसाठी बसेस आणि आवश्यक प्रवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून, नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मदत आणि आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात आहे.







