मालवण (प्रतिनिधी) : मालवण-कुडाळ मतदारसंघातील खड्डेमय रस्त्यांचे व्हिडीओ आणि रिल्स सोशल मीडियावर पोस्ट करणारे माजी आमदार वैभव नाईक हे त्यांच्याच दहा वर्षांच्या आमदारकीतील अपयश जनतेसमोर मांडत आहेत, अशी टीका शिवसेना मालवण तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी केली. “नाईक यांनी रस्त्यांची चिंता करू नये; रिल्स बनवून स्वतःचीच पोलखोल करत राहावी,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
मालवण येथील महायुतीचे आमदार निलेश राणे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत लुडबे बोलत होते. यावेळी मालवण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, शिवाजी केळूसकर, गणेश परब आदी उपस्थित होते.
मंदार लुडबे म्हणाले की, माजी आमदार वैभव नाईक दहा वर्षे आमदार राहिले. त्यांच्या कार्यकाळात आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यकाळात मालवण तालुक्यातील अनेक रस्ते नादुरुस्त झाले. आता त्याच रस्त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून नाईक स्वतःच आपल्या कारभाराची पोलखोल करत आहेत. “दोघेही निष्क्रिय म्हणून घरी बसले आहेत. राऊत जनतेला छळतात, तर नाईक जनतेला फसवतात,” अशी टीकाही त्यांनी केली.
याउलट आमदार निलेश राणे यांचा कार्यकाळ दोन वर्षेही पूर्ण झालेला नसताना त्यांनी मालवण-कुडाळच्या विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून आणला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधी उपलब्ध झाला असून, या निधीतून रस्ते आणि इतर विकासकामांना दिवाळीनंतर सुरुवात होणार असल्याचा दावा लुडबे यांनी केला.
पावसाळ्यामुळे रस्त्यांच्या कामांना काही काळ अडथळा येत असला तरी मालवणमधील रस्ते वर्षभरात पूर्णपणे दुरुस्त करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आमदार निलेश राणे रस्ते शंभर टक्के दुरुस्त करतील, हा जनतेचा विश्वास आहे,” असेही ते म्हणाले.
‘आम्ही रिल्स बनवल्यास नाईकांना महागात पडेल’
उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनीही वैभव नाईक यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून टीका केली. नाईक खोटे व्हिडीओ बनवून आमदार निलेश राणे यांच्यावर आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला. “दहा वर्षे आमदार राहिलेल्या व्यक्तीने २२ महिने आमदार राहिलेल्या व्यक्तीला रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत जाब विचारणे संयुक्तिक नाही,” असे पाटकर म्हणाले.
आमदार निलेश राणे यांनी आणलेला कोट्यवधींचा निधी नाईकांना बोचत असल्याचा आरोप करत, “यापुढे रिल्स बनवताना नाईक यांनी दहा वेळा विचार करावा. रिल्स आम्हालाही बनवता येतात; मात्र आम्ही रिल्स बनवल्यास त्या नाईकांना महागात पडतील,” असा इशाराही दीपक पाटकर यांनी दिला.







