सिंधुदुर्गनगरी, दि. ३० (जिमाका) : केंद्र व राज्य शासनाच्या ‘अँग्रीस्टॅक डिजिटल कृषी मिशन’ अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा युनिक फार्मर आयडी तयार करण्याची मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पुढील हंगामापासून विविध शासकीय योजनांचा लाभ सुरळीत मिळण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील आंबा, काजू, भात, नारळ उत्पादक शेतकऱ्यांसह ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गटांनी शासकीय यंत्रणेसोबत सक्रिय सहभाग घेत गावातील शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
फार्मर आयडीमुळे पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधी यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच आयडीवर उपलब्ध होणार आहे. तसेच पीक विमा, किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) कर्ज, फळबाग अनुदान, आंबा-काजू प्रक्रिया योजना आदींसाठी नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
याशिवाय ई-पीक पाहणी, ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात जोडली जाणार असून भविष्यात कोणत्याही योजनेसाठी वारंवार कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना विशेष योजनांचा लाभ थेट मिळण्यास तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची मदत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यासही या आयडीचा उपयोग होणार आहे.
नोंदणीसाठी आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक तसेच ७/१२ आणि ८-अ उतारा आवश्यक आहे. शेतकरी आपल्या गावातील सीएससी किंवा महा-ई-सेवा केंद्रावर अथवा https://agristack.gov.in� या संकेतस्थळावर स्वयं-नोंदणी करून फार्मर आयडी तयार करू शकतात. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.







