मालवण (प्रतिनिधी) :
मालवण शहरातील भरड नाका येथील दत्त मंदिराजवळ सोमवारी सकाळी वीजेचा धक्का लागून माकडाचे पिल्लू खाली पडल्याची घटना घडली. जखमी अवस्थेत असलेल्या या पिल्लाला स्थानिक नागरिक, प्राणीमित्र आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे वेळीच उपचार मिळाले आणि त्याचे प्राण वाचवण्यात यश आले.
ही घटना भरड येथील स्थानिक व्यावसायिक राजन बादेकर यांच्या दुकानासमोर घडली. वीजेचा धक्का लागल्याने माकडाचे पिल्लू खाली पडल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी विलंब न करता श्रीराज बादेकर यांच्याशी संपर्क साधला. श्रीराज बादेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वनविभागाला घटनेची माहिती दिली.
दरम्यान, प्राणीमित्र तेजस नार्वेकर तसेच डॉ. रमाकांत गावकर घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत पडलेल्या पिल्लाची पाहणी करून त्यांनी तातडीने प्राथमिक उपचार सुरू केले. त्याचवेळी वनविभागाचे आरआरटी अधिकारी केदार हडकर यांनीही घटनास्थळी उपस्थित राहत पुढील कार्यवाही केली.
पिल्लाची प्रकृती लक्षात घेऊन त्याला पुढील उपचारांसाठी कट्टा येथे नेण्यात आले. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत दाखवलेली तत्परता, प्राणीमित्रांनी केलेली मदत आणि वनविभागाच्या सहकार्यामुळे जखमी माकडाच्या पिल्लाला वेळेत उपचार मिळाले.
या प्रसंगातून वन्यजीव संकटात सापडल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ वनविभाग आणि प्राणीमित्रांशी संपर्क साधण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
या बचावकार्यात श्रीराज बादेकर, राजन बादेकर, प्रसाद हळदणकर, अदिती आचरेकर यांच्यासह वनविभागाचे अधिकारी आणि प्राणीमित्र सहभागी झाले.







