मंडपापासून अवघ्या ५० मीटरवर दुर्घटना; पाच जखमी, वेल्डिंगच्या त्रुटीचा प्राथमिक अंदाज
मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या उत्साहाला शनिवारी रात्री मोठं गालबोट लागलं. भुलेश्वरच्या प्रसिद्ध ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्तीच्या आगमन सोहळ्यात तब्बल २२ फूट उंच आणि सुमारे तीन टन वजनाची मूर्ती अचानक कोसळली. या भीषण दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. मंडपापासून अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावर ही दुर्घटना घडली.
शनिवारी रात्री सुमारे ९.५१ वाजण्याच्या सुमारास बलराम मर्चंट रोड, कबुतरखाना, जय अंबे चौक परिसरात हा प्रकार घडला. भायखळ्याहून भुलेश्वरच्या दिशेने मूर्ती नेली जात असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती रस्त्यावर कोसळली. मूर्तीखाली काही नागरिक दबले गेले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
या दुर्घटनेत भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि ब्रिजेश हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. त्यांच्यावर जी.टी. आणि जे.जे. रुग्णालयांसह इतर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, पालिकेची आपत्कालीन यंत्रणा आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. मूर्तीखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले.
वेल्डिंगच्या त्रुटीमुळे दुर्घटना?
दरम्यान, मूर्ती कोसळण्यामागे रस्त्यावरील खड्डे किंवा नट-बोल्ट सैल होणे याबाबत सुरुवातीला चर्चा होती. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात मूर्तीला आधार देणाऱ्या लोखंडी फ्रेमच्या वेल्डिंगमध्ये त्रुटी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वेल्डिंगचा आधार तुटल्यामुळे मूर्ती फ्रेममधून घसरून खाली पडल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. मात्र दुर्घटनेचे अंतिम कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी डी.बी. मार्ग पोलिसांनी Accidental Death Report (ADR) नोंदवला असून दुर्घटनेच्या कारणांचा पुढील तपास सुरू आहे. मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरापासून ते मूर्तीची वाहतूक आणि सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या संबंधितांपर्यंत सर्व बाबी तपासाच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या दुर्घटनेमुळे मोठ्या आणि अवजड गणेशमूर्तींच्या वाहतुकीदरम्यान सुरक्षा मानकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मूर्तीची संरचना, लोखंडी फ्रेम, वेल्डिंग, वाहतुकीची पद्धत आणि मार्गाची सुरक्षितता यांची पूर्वतपासणी कितपत केली जाते, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
बाप्पाच्या आगमनासाठी जमलेल्या गर्दीतच दोन जणांचा मृत्यू झाल्याने भुलेश्वर परिसरावर शोककळा पसरली आहे. उत्सवाच्या आनंदाला लागलेले हे गालबोट भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अधिक कठोर सुरक्षा उपाययोजनांची गरज अधोरेखित करत आहे.







