आधीच १३.५ टक्के भाडेवाढ; गणेशभक्तांना एकूण ४३.५० टक्के वाढीचा भार
मुंबई : गौरी-गणपती उत्सवासाठी ग्रुप पद्धतीने आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांना यंदा एसटीच्या प्रवासासाठी मोठा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. एसटी महामंडळाने ग्रुप बुकिंगसाठी ३० टक्के अतिरिक्त प्रवासी भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी महामंडळाने केलेल्या १३.५ टक्के कायमस्वरूपी प्रवासी भाडेवाढीमुळे गणेशभक्तांवर एकूण ४३.५० टक्के भाडेवाढीचा भार पडणार आहे.
या निर्णयामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या अतिरिक्त भाडेवाढीचा परिवहन मंत्र्यांनी फेरविचार करावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाने दिला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी ही भूमिका मांडली. एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे आहे. मग प्रवाशांकडून अशा पद्धतीने अतिरिक्त भाडे का आकारले जात आहे, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.
७०० हून अधिक गाड्यांचे नियोजन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाच्या माध्यमातून ७०० हून अधिक एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, हे नियोजन महामंडळाकडे सादर करण्यात आल्याचे संघटनेने सांगितले.
एसटीच्या नियोजनानुसार ग्रुप बुकिंगची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, ग्रुप बुकिंगवर ३० टक्के अतिरिक्त भाडे आकारण्याचा निर्णय समोर आल्यानंतर प्रवाशांना मोठा आर्थिक धक्का बसला. त्यामुळे ग्रुप बुकिंगची प्रक्रिया सुमारे २० दिवस पुढे ढकलावी लागल्याचा दावा संघटनेने केला आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि उपनगरांमधून मोठ्या संख्येने नागरिक कोकणातील आपल्या मूळ गावी जातात. अनेक कुटुंबे आणि मंडळे सामूहिक पद्धतीने एसटीच्या गाड्या बुक करतात. त्यामुळे अतिरिक्त ३० टक्के भाडेवाढीचा थेट परिणाम या प्रवाशांच्या बजेटवर होणार आहे.
परिवहन मंत्र्यांना निवेदन
३० टक्के अतिरिक्त प्रवासी भाडेवाढीचा फेरविचार करण्यात यावा, यासाठी गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन दिले आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील नागरिकांसाठी भावनिक आणि पारंपरिक सण असल्याने या काळातील प्रवासावर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे. भाडेवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ग्रुप बुकिंगवर ३० टक्के अतिरिक्त भाडे आकारण्याच्या निर्णयाचा फेरविचार होणार का?
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचे लक्ष आता एसटी महामंडळ आणि परिवहन विभागाच्या भूमिकेकडे लागले आहे. एका बाजूला गणेशभक्तांचा प्रवास सुलभ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाड्यांचे नियोजन केले जात असताना, दुसरीकडे अतिरिक्त भाडेवाढीमुळे हा प्रवास महाग होणार आहे.
गणेशभक्तांचा प्रवास आणि एसटीचे आर्थिक गणित यांचा समतोल साधण्यासाठी महामंडळ भाडेवाढीचा फेरविचार करणार का, हे आता महत्त्वाचे ठरणार आहे.






