नांदेड येथे पार पडलेल्या आंतर विद्यापीठ अश्वमेध राज्यस्तरीय स्पर्धेत मालवणचा सुपुत्र रजत रविकिरण तोरसकर आणि त्याच्या संघाने उज्वल यशाची नोंद केली आहे. नागपूर विभागातील रामनाथ तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना रजत व संघाने अत्यंत चुरशीचा आणि दर्जेदार खेळ करत अंतिम फेरी गाठली आणि उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम ठेवत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली.
यापूर्वी सलग दोन वर्षे नागपूर संघाने रौप्य व कांस्य पदक पटकावले होते. मात्र यंदा रजत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दमदार खेळ करून संघाला सुवर्णपदक मिळवून दिले.
रजत तोरसकरने टेबलटेनिसचे प्राथमिक धडे मालवण येथील कोरगांवकर टेबल टेनिस अकादमीमध्ये गिरवले. त्याने नुकत्याच राजस्थान येथे पार पडलेल्या ‘खेलो इंडिया’ टेबलटेनिस स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.
या यशाबद्दल रजत तोरसकरवर सर्व स्तरातून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. मालवणच्या या तरुण खेळाडूने पुन्हा एकदा आपली प्रतिभा सिद्ध करत तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.







