भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संकलित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन प्रश्नोत्तर पुस्तिका’चे प्रकाशन करण्यात आले.
या पुस्तिकेचे जिल्ह्यातील चार हजार विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येणार असून, त्यावर आधारित प्रश्नोत्तर स्पर्धा लवकरच आयोजित केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सखोल ज्ञान मिळावे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजू, जिल्हा महिला संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडुरकर, तालुका अध्यक्ष रविकांत कदम, सरचिटणीस प्रकाश पवार, कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम, बॅ. नाथ पै सेवांगण कट्टाचे पदाधिकारी दीपक भोगटे, बापू तळवडेकर, शोभा म्हाडगुत, श्रीधर गोंधळी, मधु वालावलेकर, समाजसेवक पुरस्कार प्राप्त विद्या चिंदरकर, संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार, सचिव योगेश वराडकर, प्रचार व पर्यटन सचिव संग्राम कासले, सचिन कासले, हिशोब तपासणीस शंकर कदम, कार्यालयीन सचिव मनोज काळसेकर, तालुका महिला सरचिटणीस समता डिकवलकर, संघटक भरत पेंडूरकर, तसेच विविध गाव शाखांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी सेवांगणचे विश्वस्त दीपक भोगटे म्हणाले,
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राची ओळख मुलांना व्हावी यासाठी ही प्रश्नोत्तर पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या संपूर्ण कार्याची आणि विचारांची ओळख होणार आहे.”
या १५० प्रश्नोत्तरांचा समावेश असलेल्या पुस्तिकेवर आधारित स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार हजार विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी नोंदणी करण्यात येणार असून हा उपक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे.







